राज्यातील निर्बंधांच्या स्थितीदरम्यान पुढाकार
वार्ताहर / हुबळी
राज्यात कोरोना संसर्ग वाढू लागल्यावर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा याकरिता कन्नडिगासच्या टीमने एक ऍप विकसित केले असून ते मोफत उपलब्ध आहे. या ऍपद्वारे नीट तसेच अन्य स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना मदत होणार आहे.
विविध शासकीय विभागांमधील भरती परीक्षांसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांचा संच प्रत्येकदिनी प्राप्त होणार आहे. या ऍपच्या माध्यमातून परीक्षाही होणार असून कामगिरीनुसार विद्यार्थ्यांना रोख बक्षिसेही देण्यात येणार आहेत. शासकीय शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी डोळय़ासमोर ठेवूनच हे ऍप पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
एसएचएलआर टेक्नॉसॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत हुबळीतील लॅमिंग्टन शाळेत स्मार्ट क्लास प्रकल्पावर काम केले होते. या कंपनीसह इन्स्टिटय़ूट ऑफ विनर्स ड्रीम्स आणि व्ही वर्क्स सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेडने हे ऍप विकसित केले आहे. हे ऍप अधिकृतपणे लाँच होण्यापूर्वीच 1 हजारांहून अधिकवेळा डाउनलोड करण्यात आले आहे.
प्ले स्टोअरवर शेकडो ऍप्स आहेत. पण त्यांच्याकडून केवळ प्रश्नपत्रिका सादर केल्या जातात आणि विद्यार्थ्यांना सोडविण्यास सांगण्यात येते. पण विनर ड्रीम ऍपमध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या विषय प्राधान्यानुसार परीक्षांचे नियमित स्वरुपात आयोजन करणार आहोत, असे उद्गार ऍपच्या विकासकांपैकी एक असलेल्या किरण कुमार अन्निगेरी यांनी काढले आहेत.
दैनंदिन परीक्षेत सामील होऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्यांना 10 रुपये भरावे लागणार आहेत. यातून जमा होणारी रक्कम विद्यार्थ्यांमध्ये बक्षिसाच्या स्वरुपात वितरित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये गांभीर्य निर्माण करण्यासाठी ही नाममात्र रक्कम घेण्यात येत आहे. यातून नफा कमाविण्याचा आमचा हेतू नाही. स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांनी कुठल्याही भीतीशिवाय सामोरे जावे, या उद्देशानेच हे काम हाती घेतल्याचे किरण यांनी म्हटले आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हे ऍप सादर करण्याची योजना होती. पण कोविड दिशानिर्देशांमुळे हा सोहळा रद्द करावा लागला आहे. विद्यार्थ्यांच्या लाभासाठी हे ऍप त्वरित प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले
आहे.