शासनाचा अजब कारभार : खानापुरातील सरकारी रुग्णालय इमारतीचे काम सुरू
खानापूर : येथील सरकारी रुग्णालय अद्ययावत बनवण्यासाठी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी 31 कोटी 50 लाखाचा निधी मंजूर केला आहे. टेंडरचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. सध्या असलेली इमारत पाडवून त्या ठिकाणी शंभर खाटांचे सर्वसोयीनियुक्त असे रुग्णालय बांधण्यात येणार आहे. आता याच रुग्णालयाच्या डागडुजीसाठी पुन्हा 25 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातून ऑपरेशन थिएटरच्या डागडुजीचे काम सुरू असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी संजय नांद्रे यांनी सांगितले. या अजब कारभाराने जनतेतून आश्चर्य व्यक्त होत आहे.
पुढील पाच-सहा महिन्यात आता असलेल्या रुग्णालयाची इमारत पाडवून नवीन इमारत बांधण्यासाठी 31 कोटी 50 लाखाचा निधी मंजूर झालेला असताना डागडुजीसाठी 25 लाखाच्या निधीची आवश्यकता होती का? या 25 लाखाच्या निधीतून ऑपरेशन थिएटरसह स्वच्छतागृह व इतर दुरुस्तीची कामे करण्यात येत असल्याचे नांद्रे यांनी सांगितले. शासनाचा 25 लाखाचा निधी नवीन बांधण्यात येणाऱया इमारतीसाठी दिला गेला असता तर योग्य झाले असते. आता एमसीएच रुग्णालयाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच नवीन रुग्णालयासाठी निधीही मंजूर झाला आहे. शंभर खाटांच्या इमारतीचे काम सध्या सुरू असलेली आरोग्य सेवा सुरू ठेवून इमारत पाडवून नवीन अद्ययावत इमारत बांधण्यात येणार असताना 25 लाखाचा निधी दुरुस्तीसाठी मंजूर करणे गरजेचे होते का, हीच रक्कम नवीन रुग्णालयाच्या निधीत समाविष्ठ केली असती तर योग्य झाले असते.
एकूणच शासनाचा 25 लाखाचा निधी वाया जाणार हे स्पष्ट आहे. पाडवल्या जाणाऱया इमारतीच्या दुरुस्तीसाठी इतका मोठा निधी कसा काय दिला गेला. या दुरुस्तीतून काय साध्य होणार आहे. 25 लाख निधीतून ऑपरेशन थिएटरच्या टाईल्स व ऑपरेशन कठडा यासह इतर छोटी कामे सुरू आहेत. इतक्या मोठय़ा निधीतून फक्त ऑपरेशन थिएटरची दुरुस्ती होणार असल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.