जिया खान मृत्यु प्रकरणात ( Jiya Khan Suicide case ) मुख्य संशयित सूरज पांचोली याला विशेष सीबीआय न्यायालयाने निर्दोष घोषित करून त्याची सुटका केली आहे. विशेष सीबीआय न्यायालयात या प्रकरणची सुनावणी पूर्ण झाली होती. न्यायाधीश एएस सय्यद यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत अंतिम निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर जवळजवळ 10 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला आहे.
दरम्यान, आजच्या सुनावणीसाठी या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असणारा अभिनेता सूरज पांचोली हा विशेष सीबीआय न्यायालयात दाखल झाला होता. जियाची आई राबिया खान यांनीही सूरज पांचोलीवर मुलीचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला होता.
३ जून २०१३ रोजी अभिनेत्री जिया खान तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. तसेच तिच्या घरातून सहा पानी सुसाइड नोटही सापडली होती. त्यामध्ये तिने प्रेमात आपल्याला खुपच त्रास झाल्य़ाचं सागून आता जगण्याची ईच्छा नसल्याचे म्हटले होते. आत्महत्या म्हणून या घटनेकडे प्रथमता दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर जियाच्या आईने आपल्या मुलीची हत्या तिचा प्रियकर सूरज पांचोलीने केला असा थेट आरोप केला.