क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित एएफसी अझमनगर चषक 12 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत रॉजर्स क्रिकेट अकादमी संघाने अंतिम लढतीत लायाज क्रिकेट अकॅडमी संघाचा अटीतटीच्या सामन्यात केवळ 3 धावांनी पराभव करत जेतेपद पटकावले. समर्थ जाधव सामनावीर ठरला.
जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात रॉजर्स क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 7 बाद 156 धावा केल्या. त्यात अवनीश हट्टीकरने 32, समर्थ जाधवने 20, अर्णव पाटीलने 19, जियान सलीमवालेने 18, संकेत नाकाडी 15 धावा केल्या. लायाज अकादमीतर्फे स्वयम खोत 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना लायाज अकादमी संघाने 25 षटकात 7 गडी बाद 153 धावा केल्या. त्यात स्वयम खोतने 56, खंडू पाटीलने 37 धावा केल्या. रॉजर्स अकादमीतर्फे समर्थ जाधवने 3 गडी बाद केले.
बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे महारुफ समीर किल्लेदार, जिमखाना सचिव प्रसन्ना सुंठणकर, संजय मोरे व सुहास कुलकर्णी यांच्या हस्ते विजेत्या रॉजर्स व उपविजेत्या लायाज अकादमी संघांना चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज अवनीश हट्टीकर, उत्कृष्ट गोलंदाज मोहम्मद हमजा, उगवता क्रिकेटपटू स्वराज जुवेकर, इम्पॅक्ट खेळाडू स्वयम खोत, स्पेशल परफॉर्मन्स साईराज चव्हाण तर मालिकावीर अर्जुन येळ्ळूरकर यांनी वैयक्तिक बक्षीसे पटकावली. त्यांना चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी मिलिंद चव्हाण, परशराम पाटील, सचिन साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.