प्रतिनिधी / बेळगाव
उत्तर मतदारसंघातील म. ए. समितीचे उमेदवार ऍड. अमर येळ्ळूरकर यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून दररोज वेगवेगळ्या विभागात प्रचारफेरी काढण्यात येत आहे. शुक्रवार दि. 28 रोजी प्रचाराचा पाचवा दिवस असून कॅम्प परिसरात प्रचार पदयात्रा काढण्यात येणार आहे. सकाळी 8 वा. कॅम्प येथील उभा मारुती मंदिरपासून प्रचारफेरीला सुरुवात होणार आहे.
कॅम्प परिसरात 10 हजारांहून अधिक मतदार असून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी सकाळी 8 वा. प्रचारास प्रारंभ होईल. या परिसरातील सर्व गल्ल्यांमध्ये पदयात्रा काढली जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5 वा. संगोळ्ळी रायण्णा चौकातील सोन्या मारुती मंदिरपासून प्रचारफेरीची सुरुवात होईल. शिवाजीनगर येथील 1 ते 5 गल्ल्या तसेच पंजीबाबा मठ व साईमंदिर परिसरातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जाणार आहेत. प्रचारफेरीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.