जखमी जवानाची माहिती : पूंछमध्ये ड्रोन-स्निफर डॉगसह शोधकार्य
वृत्तसंस्था/ श्रीनगर
काश्मीरमध्ये लष्कराच्या ट्रकवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. सुरुवातीला अपघात वाटत असलेली ही घटना दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आता किमान सहा ते सात दहशतवाद्यांनी रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड हल्ला केल्याची माहितीही हल्ल्यात जखमी झालेल्या जवानाने दिली आहे. सदर जवान सध्या गंभीर असून त्याच्यावर राजौरी येथील लष्करी इस्पितळात उपचार सुरू आहेत.
काश्मीरमधील पूंछ येथे गुरुवारी झालेल्या हल्ल्याचा तपास गतीने केला जात आहे. या हल्ल्यात पाच जवान हुतात्मा झाल्यामुळे भारतीय लष्कर आणि संरक्षण दलाला हादरा बसला आहे. जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि 8 सदस्यीय फॉरेन्सिक टीम पूंछला रवाना झाली आहे. शुक्रवारी ही टीम घटनास्थळी पोहोचल्यानंतर बॉम्बशोधक पथक आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुपकडून (एसओजी) परिसराची कसून तपासणी सुरू झाली आहे.
पूंछपासून 90 किमी आणि नियंत्रण रेषेपासून (एलएसी) 7 किमी अंतरावर असलेल्या असलेल्या महामार्गावरील जंगलभागात दहशतवाद्यांनी लष्करी वाहनावर हल्ला केला होता. गुऊवारी दुपारी 3 वाजता राजौरी सेक्टरमध्ये सैन्याची तीन वाहने भिंबर गली येथून राजौरी-पूंछ राष्ट्रीय महामार्गावर पूंछच्या दिशेने जात असताना हा हल्ला झाला. मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेचा फायदा घेत दहशतवाद्यांनी एका वाहनावर हल्ला केला. यानंतर ग्रेनेड फेकले आणि सुमारे 50 राउंड फायर केले. यामुळे वाहनाने पेट घेतला. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध आणि मागमूस घेण्यासाठी गुप्तचर यंत्रणा सक्रीय झाली आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात ड्रोन स्निफर डॉगसह शोधमोहीम सुरू केली आहे. हे दहशतवादी दोन गटात विभागले गेल्याचे बोलले जात आहे.
पीपल्स अँटी पॅसिस्ट फ्रंटने (पीएएफएफ) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पीपल्स अँटी पॅसिस्ट फ्रंट हा पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा पाठिंबा असलेला एक गट आहे. कलम 370 हटवल्यानंतरच पीएएफएफ संघटनेने डोके वर काढले आहे.
हुतात्मा झालेले जवान पंजाब-ओडिशामधील
या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांची नावे शुक्रवारी लष्कराकडून जाहीर करण्यात आली आहेत. लान्स नाईक देबाशिष बसवाल, लान्स नाईक कुलवंत सिंग, शिपाई हरकिशन सिंग, शिपाई सेवक सिंग आणि हवालदार मनदीप सिंग अशी हुतात्मा जवानांची नावे आहेत. यातील लान्स नाईक देबाशिष बसवाल हे ओडिशाचे रहिवासी आहेत, तर इतर चार हुतात्मा जवान पंजाबचे रहिवासी आहेत. त्यांची पार्थिव मूळ गावी रवाना करण्यात आली आहेत.