माजी चेअरमन दुर्गेश शिरोडकर यांची मागणी
मडगाव : गोवा डेअरी भ्रष्टाचारप्रकरणी सहकार खात्याने केलेली कारवाई योग्य आहेच. 14 संचालकांना जो दणका दिलेला आहे, त्यावर न थांबता, त्यांच्याकडून सर्व रक्कम वसूल करावी. ही रक्कम वसूल केली तरच गोवा डेअरीला काही प्रमाणात वाचविणे शक्य होईल, असे मत गोवा डेअरीचे माजी चेअरमन दुर्गेश शिरोडकर यांनी व्यक्त केले आहे. सद्याच्या परिस्थितीत गोवा डेअरीची परिस्थिती खुपच वाईट झालेली आहे. भ्रष्टाचार, नोकर भरती तसेच दुध गळती यामुळे गोवा डेअरी डबघाईला आलेली आहे. तिला सावरण्याची अत्यंत गरज आहे. 14 संचालकांना निलंबित करून त्यांना मोकळे सोडून देता कामा नये. त्यांच्याकडून सर्व रक्कम वसूल केल्यास गोवा डेअरीला थोड्या प्रमाणात दिलासा मिळू शकेल, असे शिरोडकर म्हणाले.
यापुर्वीची 1. 35 कोटीची वसुली नाही
यापुर्वी कर्मचाऱ्यांची खोगीरभरती केल्याने 12 संचालक अपात्र ठरले होते. पण त्यातील 1 कोटी 35 लाखांची वसुली अद्याप झालेली नाही. तीन वर्षे होऊन गेली आहेत, पण वसुलीचा काहीही पत्ता नाही. त्यानंतर पुन्हा तेच लोक संचालक, चेअरमन झाले.
एका संचालकाला अभय का दिले?
चौदा संचालकांना निलंबित करताना एका संचालकाला का अभय दिले जात आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गोवा राज्य सहकारी संघ लि.च्या अध्यक्षावर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावामुळे गोवा डेअरीच्या 14 संचालकांना निलंबित करण्यात आले आहे का? असा सवालही शिरोडकर यांनी उपस्थित केला आहे. गोवा डेअरीचे दोघे संचालक गोवा राज्य सहकारी संघ. लि.चे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्याच्यावर टांगती तलवार ठेवण्यात आल्याचा संशय देखील दुर्गेश शिरोडकर यांनी व्यक्त केला आहे. गोवा राज्य सहकारी संघ. लि.च्या अविश्वास ठरावामुळे विद्यमान अध्यक्षाचे आसन धोक्यात आले आहे. या दोन संचालकांना आपल्या बाजूने खेचण्यासाठीच हे निलंबन प्रकरण पुढे केले असावे अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.