परिवहन-कामगार खात्यात समन्वयाचा अभाव : कामगारांना बसपासची प्रतीक्षा
प्रतिनिधी /बेळगाव
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱया कर्मचाऱयांना परिवहनमार्फत मोफत बसपास देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कामगार खात्याकडून याबाबत कोणतीच दखल घेतली जात नसल्याने हजारो बांधकाम कर्मचाऱयांना मोफत बसपासपासून दूर राहावे लागले आहे. असंघटित कामगारांना ये-जा करणे सोयीस्कर व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात कामगारांना अद्याप बसपासच मिळाले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
परिवहनने निर्णय घेतल्यानंतर दोन-तीन महिन्यात बसपासचे वितरण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप बसपास प्रक्रियेला प्रारंभ झाला नाही. जिल्हय़ात बांधकाम करणाऱया कर्मचाऱयांची संख्या अधिक आहे. त्यांना प्रवास करणे सोयीस्कर व्हावे, यासाठी बसपासचे वितरण केले जाणार होते. मात्र, बांधकाम आणि परिवहन या दोन्ही खात्यांमध्ये समन्वयाच्या अभावामुळे मोफत बसपास वितरणाचे काम रखडले आहे. त्यामुळे मोफत बसपास कधी मिळणार? या प्रतीक्षेत बांधकाम कामगार आहेत.
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱया कर्मचाऱयांना कामासाठी वेगवेगळय़ा ठिकाणी फिरावे लागते. यासाठी बस प्रवास सोयीस्कर ठरतो. शिवाय महिलादेखील कामाला जातात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी परिवहनने मोफत बसपास देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्याप हा निर्णय प्रत्यक्षात अंमलात आला नसल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या दोन वर्षात बांधकाम क्षेत्रावर मोठे संकट ओढवले होते.
दरम्यान, कामगारदेखील अडचणीत सापडले होते. यासाठी बांधकाम कामगारांना दिलासा म्हणून मोफत बसपास देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसत आहे.