भाजपा नेते किरीट सोमय्या यांची माहिती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
उध्दव ठाकरे सरकार मागील महिन्यात जमीनदोस्त झाले असून दापोलीत सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणात आता शिवसेना नेते व माजी पालकमंत्री अनिल परब यांची सुटका नाही. येत्या ऑक्टोबरमध्ये तेथील रिसॉर्ट जमीनदोस्त होण्याचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होणार असल्याचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. येत्या 8 ते 10 दिवसात रिसॉर्ट पाडण्याबाबत निविदा प्रक्रिया केली जाणार त्यांनी म्हटले आहे.
रत्नागिरीत आलेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांच्या भेटी घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी दापोली मुरुड येथील साई रिसॉर्ट पाडण्याबाबत दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीची त्यांनी माहिती जाणून घेतली. त्यानंतर माळनाका येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत त्या संदर्भातील माहिती दिली.
दापोलीतील शिवसेना नेते तथा माजी पालकमंत्री अनिल परब यांनी अनधिकृत रिसॉर्टचे बांधकाम केले आहे. त्याचप्रमाणे येथे बांधकाम करून सीआरझेडचा भंगही करण्यात आल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठेवला आहे. या बाबत वेगवेगळ्य़ा याचिका खेड व दापोली न्यायालयात करण्यात आल्या आहेत. खेडमधील याचिका 6 महिन्यापूर्वी दाखल करण्यात आली. परंतु प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. उध्दव ठाकरे यांच्या दबावामुळे याचिका कचऱयाच्या डब्यात फेकून देण्यात आली होती. पण आता ठाकरे सरकार गेल्याच महिन्यात जमीनदोस्त झाल्याचा उपरोधिक टोला सोमय्या यांनी लगावला आहे. परब यांनी केलेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणात खोटे दस्तऐवज व फसवणूक केल्याप्रकरणी येत्या 12 सप्टेंबर रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. तर अनधिकृत बांधकाम यात फौजदारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता सोमय्या यांनी वर्तवली आहे. दापोली न्यायालयातही 12 सप्टेंबरलाच सुनावणी आहे. या ठिकाणीही अनिल परब यांच्याविरोधात कारवाई सुरु होईल, असा विश्वास सोमय्या यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, शहराध्यक्ष सचिन करमरकर, माजी नगरसेवक उमेश कुलकर्णी उपस्थित होते.
परब यांच्यावर प्रशासनाची कारवाईसाठी टाळाटाळः सोमय्या
सीआरझेडमधील बांधकाम केल्याप्रकरणात दापोलीत एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु तशाच प्रकरणात अगदी शेजारी असणाऱया साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांच्यावर कारवाई प्रशासनाने का केली नाही, असा प्रश्नही सोमय्या यांनी उपस्थित केला. साई रिसॉर्ट प्रकरणात 15,800 स्क्वेअर फुटाचे बांधकाम करताना रोख रकमेचा वापर करण्यात आल्याचा संशय असून या प्रॉपर्टीचा टॅक्सही अनिल परब यांनी भरला आहे. या प्रकरणातही आयकर विभागाकडून चौकशी सुरु झाल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
लवकरच अनेकांच्या चौकशीचे लागणार नंबर
मढ येथील बांधकामासंदर्भात तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व मत्स्य विभागाचे मंत्री अस्लम शेख यांच्या मंत्रालयातील कामाची चौकशी सुरू आहे. लवकरच यातील काहींचा नंबर लागणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.