कामकुमारनंदी जैनमुनी खून प्रकरण : न्यायालयात चोख बंदोबस्त
चिकोडी : हिरेकोडी (ता. चिकोडी) येथील जैनमुनी आचार्य 108 कामकुमारनंदी महाराजांच्या खून प्रकरणातील आरोपींना सोमवार दि. 17 रोजी चिकोडी न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायाधीशांनी आरोपींना 21 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे दोन्ही आरोपींची सोमवारी हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली. जैन मुनींच्या खून प्रकरणातील आरोपी नारायण माळी व हसन ढालायत हे न्यायालयाच्या आदेशानुसार सात दिवसांपासून पोलीस कोठडीत होते. पोलिसांनी या काळात जैन मुनी खूनप्रकरणी त्यांच्याकडून बहुतांश माहिती प्राप्त केली आहे. आज पोलीस कोठडीची मुदत संपल्याने चिकोडी पोलिसांनी आरोपींना सोमवारी सायंकाळी 4 च्या दरम्यान चिकोडी शहरातील वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश चिदानंद बडीगेर यांच्यासमोर हजर केले. दोन्ही आरोपींना 21 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीचा आदेश न्यायाधीश बडीगेर यांनी दिला आहे. यामुळे दोन्ही आरोपींना कडक बंदोबस्तात बेळगावच्या हिंडलगा कारागृहात हलविले. यावेळी चिकोडी न्यायालय परिसरात लोकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे चिकोडीचे डीवायएसपी बसवराज यलिगार, सीपीआय आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.