आयुष फेडरेशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : पत्रकार असल्याचे सांगून शहरासह तालुक्यातील खासगी रुग्णालये चालविणाऱ्या डॉक्टरांना ब्लॅकमेलिंग करण्यात येत आहे. संबंधितांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन ‘आयुष फेडरेशन ऑफ इंडिया’च्या बेळगाव तालुका विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आयुष फेडरेशन ऑफ इंडियाच्या काही सदस्यांकडून शहरासह गावामध्ये खासगी रुग्णालये चालवत आहेत. सदर ठिकाणी पत्रकार असल्याचे सांगत काही जणांकडून रुग्णालयांची तपासणी करण्यात येत आहे. आपल्याला जिल्हा आरोग्य खात्याकडून सर्वेक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. यासाठी रुग्णालयाची तपासणी करण्यात येत असल्याचे सांगून लूट केली जात आहे. बेळगाव तालुक्यासह खानापूर, हुक्केरी तालुक्यामध्येही असे प्रकार घडत असल्याची तक्रार संघटनेकडून करण्यात आली. बिलाल जमादार व राजशेखर पाटील अशी नावे सांगून संबंधिताकडून क्लिनिकची तपासणी करण्यात आली आहे. त्या व्यक्तींकडून केए 24 एम 8224 या नंबर प्लेटच्या दुचाकीचा वापर करण्यात आला आहे. सदर व्यक्तींकडून डॉक्टरांना ब्लॅकमेलिंग करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आयुष संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. पद्मराज पाटील, उपाध्यक्ष डॉ. सुरेश चौगुला, डॉ. ए. एस. कोणी, डॉ. राजेश पाटील, डॉ. नाडगौडा, डॉ. ज्योती खोत, सचिव डॉ. प्रवीण डोण्यण्णावर, डॉ. आर. एच. घोरपडे, डॉ. विनायक पाटील आदी उपस्थित होते.