ड्रग्जच्या काळ्या पैशातून चित्रपट निर्मिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (एनसीबी) मोठे यश मिळाले आहे. एजन्सीने या ड्रग्ज सिंडिकेटचा नेता आणि तामिळ चित्रपट निर्माता जाफर सादिक याला अटक केली आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि मलेशियामध्ये सुमारे 2 हजार कोटी ऊपयांचे अमली पदार्थ पाठवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. सादिक हा व्यवसायाने चित्रपट निर्माता असून अमली पदार्थांपासून आपला काळा पैसा लपवण्यासाठी त्याने चित्रपट बनवण्याचा मार्ग निवडल्याचा पोलिसांना संशय आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अलिकडेच आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करांच्या एका सिंडिकेटचा पर्दाफाश केला होता. या गैरधंद्यांचे नेटवर्क भारताबाहेर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि मलेशियापर्यंत पसरले होते. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, या सिंडिकेटने आतापर्यंत 45 वेळा ड्रग्ज विदेशात पाठवले आहेत. याची पाळेमुळे खोदली असता सिंडिकेटचा म्होरक्या तामिळ चित्रपट उद्योगाशी संबंधित असल्याचे एनसीबीच्या तपासात समोर आले आहे. म्होरक्याच्या अटकेनंतर आता त्याच्याकडून स्यूडोफेड्रिनचा स्रोत शोधून काढण्याच्या दिशेने तपास यंत्रणांनी प्रयत्न सुरू केले आहेत.