विवाहात नवरदेवाला मिळालं महागडं गिफ्ट ः पै-पाहुण्यांचा महागाईविरोधात अनोखा निषेध
पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि लिंबू…. हे चार शब्द ऐकल्यावर आपोआपच तोंडातून पाचवा शब्द बाहेर पडतो, तो म्हणजे महागाई. अरेरे ! महागाईच्या या ज्वालेत बऱयाच वस्तूंच्या किमती रॉकेटप्रमाणे अवकाशाला गवसणी घालत आहेत. त्यातच सध्याच्या गगनाला भिडलेल्या महागाईच्या काळात लिंबाच्या वाढत्या किमती सर्वसामान्यांची चव ‘आंबट’ करत आहेत. लिंबाच्या दरात वाढ झाल्याने देशाच्या अनेक भागांत लिंबू 300-400 रुपये प्रतिकिलो भावाने विकले जात आहेत. अनेक ठिकाणी एकच लिंबू 10 ते 15 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे आता लग्नातही नवदाम्पत्याला पै-पाहुणे लिंबू भेट म्हणून देत आहेत.
राजकोटच्या धोराजी शहरातील एका लग्नसमारंभात लोकांनी नवरदेवाला चक्क किलोभर लिंबू भेट दिले आहेत. सध्या राज्यात आणि देशात लिंबूच्या किमती मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. त्यातच, उन्हाळय़ाच्या असहय़ झळांमुळे लिंबूची मागणी आणि गरज मोठी आहे. त्यामुळेच आम्ही नवरदेवास लिंबू भेट दिल्याचे सांगत नवरदेवाचे मित्र दिनेश यांनी महागाईविरोधातील संताप व्यक्त केला. तामिळनाडूतील एका लग्नात काही दिवसांपूर्वी नरवदेवाच्या मित्रांनी जोडप्याला लग्नाचे गिफ्ट म्हणून चक्क पेट्रोल आणि डिझेल आहेर केले होते. बऱयाचदा मित्रमंडळी आपल्या मित्रांच्या लग्नात काही ना काही अनोखे गिफ्ट देत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात, आता महागाईच्या निषेधाची भर पडताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेलनंतर आता गुजरातच्या राजकोट येथील एका लग्नात मित्रांनी नवरदेवाला चक्क लिंबू भेट दिले आहेत. लग्नाला जाताना आपण नेहमीच काही ना काही गिफ्ट देत असतो. आपल्या शुभेच्छांबरोबरच हे गिफ्ट त्या जोडप्यासाठी कायम आठवण म्हणून त्यांच्यासोबत राहावे, असा आपला त्यामागील उद्देश असतो. यामध्ये कपडय़ांपासून वेगवेगळय़ा प्रकारच्या वस्तूंचा समावेश असतो.
काही दिवसांपूर्वी तामिळनाडूतील ग्रेस कुमार आणि कीर्तना यांनी लग्नगाठ बांधली. नव्या आयुष्याला सुरुवात करताना शुभेच्छा म्हणून दिले जाणारे हे गिफ्ट काहीतरी खास असावे, असे आपल्याला कायम वाटते. असाच विचार करून त्यांच्या मित्रमंडळींनी आपल्या मित्राला नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी पेट्रोल-डिझेल ‘गिफ्ट’ केले होते.