सुटी-लग्नसराईमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ : बसस्थानक फुल्ल, उत्पन्न समाधानकारक
बेळगाव : लग्नसराई, यात्रा-जत्रा, पर्यटन आणि इतर धार्मिक कार्यक्रमांमुळे प्रवाशांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. परिणामी महसुलात वाढ होत असल्याने परिवहनला सुगीचे दिवस आले आहेत. दोन वर्षांनंतर परिवहनला मे महिन्याचा सिझन समाधानकारक ठरू लागला आहे. शाळा, महाविद्यालये आणि इतर काही संघ-संस्थांना उन्हाळी सुटी आहे. त्यामुळे कुटुंबासह बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. त्याचबरोबर गोवा, मुंबई, कोल्हापूर, विजापूर, हैदराबाद, तामिळनाडू, बेंगळूर, म्हैसूर आदी ठिकाणी पर्यटकांची संख्यादेखील वाढत आहे. त्यामुळे ऑनलाईन बुकिंग आणि आगाऊ बुकिंग वाढू लागले आहे. परिवहनच्या बसेस विविध मार्गांवर फुल्ल होऊन सुसाट धावत आहेत.
मध्यवर्ती बसस्थानकात लांबपल्ल्याबरोबरच आंतरराज्य आणि स्थानिक बसेसनादेखील गर्दी वाढली आहे. वाढत्या प्रवाशांमुळे बससेवेवर ताण वाढू लागला आहे. याचबरोबर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी काही भागात बसफेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी नॉनस्टॉप बससेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच अतिरिक्त बसेस सोडल्या जात आहेत. निवडणुकीच्या कामासाठी बुकिंग केलेल्या बसेस पूर्ववतपणे वाहतुकीत दाखल झाल्या आहेत. मात्र वाढत्या प्रवाशांमुळे सार्वजनिक बसवाहतुकीवर ताण वाढला आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून दैनंदिन 700 हून अधिक बसेस विविध मार्गांवर धावत आहेत. विशेषत: बेळगाव जिल्ह्याला गोवा आणि महाराष्ट्र राज्याची हद्द लागून असल्याने महसूल अधिक मिळतो. आंतरराज्य प्रवासासाठी धावणाऱ्या बसेसची संख्या अधिक आहे. शिवाय सुटीनिमित्त गोवा आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बेळगाव विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. बेळगाव विभागाच्या एकूण उत्पन्नापैकी 40 टक्के उत्पन्न गोवा आणि महाराष्ट्र राज्यात धावणाऱ्या बसमधून प्राप्त होते. त्यामुळे बेळगाव विभागाला उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून गोवा आणि महाराष्ट्र राज्य लाभदायक आहे.
स्थानिक बसेसदेखील होताहेत फुल्ल
लग्नसराई आणि इतर कार्यक्रमांमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. लांबपल्ल्याबरोबरच स्थानिक बसेसदेखील फुल्ल होऊ लागल्या आहेत. त्यामुळे उत्पन्नही प्राप्त होऊ लागले आहे. प्रवाशांची संख्या वाढल्याने बससेवेवर अतिरिक्त ताण वाढला आहे. काही बसेस बुक करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक बसवाहतुकीवर परिणाम होऊ लागला आहे.
– पी. वाय. नायक (विभागीय नियंत्रक)