केएससीए बी डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए बी डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात जानोपँथर अकादमी गदगने टॅलेंट स्पोर्टस् हुबळीचा 103 धावांनी, हुबळी स्पोर्टस् क्लब ब संघाने श्री सिद्धाऊढ स्वामी अ हुबळी संघाचा 4 गड्यानी तर क्रिकेट अकादमी ब संघाने आनंद क्रिकेट अकादमी ब संघाचा 2 धावांनी पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळवले.
ऑटोनगर येथील केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात हुबळी क्रिकेट अकादमी ब संघाने प्रथम फलंदाजी करताना 47.3 षटकात सर्व गडी बाद 181 धावा केल्या. त्यात आदित्य एस. ने 83, विकास दोडमनी 52 धावा केल्या. आनंदतर्फे आनंद कुंभार 24 धावात 4, किशन मेघराजने 2 तर आदित्य, अक्षय व संमेद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमी ब संघाचा डाव 50 षटकात 179 धावात आटोपला. त्यात आनंद कुंभारने नाबाद 62, अक्षय पाटीलने 22, पियुश गहलोत व आदित्य कलपत्री यांनी प्रत्येकी 18 तर आदित्य पाटीलने 16 धावा केल्या. हुबळीतर्फे महांतेश, विकास, राजू व आदित्य यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात जानोपँथर क्रिकेट अकादमी अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्व गडी बाद 272 धावा केल्या. त्यात प्रल्हाद कुलकर्णीने 60, महांतेशने 59, राघवेंद्रने 32 तर प्रसादने 27 धावा केल्या. टॅलेंट हुबळीतर्फे रवीकुमारने 3, किरणने 2 तर शरण, वीरेश, अजऊद्दीन व हर्ष प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना टॅलेंट स्पोर्टस् क्लब अ संघाचा डाव 31.3 षटकात 169 धावांत आटोपला. त्यात संजयने 56, वीरेशने 44, तर रवीकुमार 19 धावा केल्या. जानोपँथरतर्फे सतीशकुमार व रियाज अहमद प्रत्येकी 3 तर महांतेशने 2 गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात श्री सिद्धाऊढ स्वामी हुबळी अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 गडी बाद 206 धावा केल्या. त्यात विष्णूने 48, आदर्श नाईकने 31, सुचेंद्रने 28 धावा केल्या. हुबळी स्पोर्टस् क्लब ब तर्फे प्रवीण आर. एस., सतीश नायकर, मदन मोहन, सुप्रित यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी स्पोर्टस् क्लब ब संघाने 34.4 षटकात 6 गडी बाद 210 धावा करून सामना चार गड्यांनी जिंकला. त्यात निखील दोडमनीने 57, माधवने 51, मदन मोहनने नाबाद 29, सागर एस. ए. ने 24 धावा केल्या. सिद्धाऊढतर्फे प्रवीणकुमारने 3 तर प्रशांत व प्रणव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.