तारिहाळ शक्तीसंघाचा जि. पं. वर हलगी मोर्चा : संबंधितांवर कारवाईची मागणी
बेळगाव : तारिहाळ ग्रामपंचायतीकडून मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राखून ठेवलेल्या निधीमध्ये गैरव्यवहार करण्यात आला आहे. योग्य ठिकाणी निधी खर्च न करता त्याचा दुरुपयोग करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघातर्फे जिल्हा पंचायत कार्यालयावर हलगी मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. तारिहाळ ग्राम पंचायतीमध्ये मागासवर्गीयांसाठी 2018 ते 2022 या कालावधीत 25 टक्के अनुदान राखून ठेवण्यात आले होते. हे अनुदान मागासवर्गीयांच्या विकासासाठीच खर्च करणे आवश्यक आहे, असे न करता ग्राम पंचायतीकडून सदर निधी दुसरीकडे वापरण्यात आला. त्यामुळे मागासवर्गीयांवर अन्याय झाला आहे. यासाठी ग्राम पंचायतीवर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. तत्कालीन ग्रा. पं. विकास अधिकारी गुजनाळ, सचिव नाईक, ता. पं. कार्यकारी अधिकारी धनवाडकर यांनी आठ दिवसामध्ये चौकशी करून झालेल्या अन्यायाचे निवारण करण्याचे सांगण्यात आले होते. आठ महिन्यांचा कालावधी उलटला तरी याची दखल घेण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर सदर संघटनेकडून कन्नड साहित्य भवन येथून जिल्हा पंचायत कार्यालयापर्यंत हलगी मोर्चा काढून जि. पं. समोर धरणे आंदोलन केले. मागासवर्गीय कल्याण निधीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी लक्ष्मण कोलकार, सागर कोलकार, मल्लाप्पा कोटगेर, पी. वाय. तलवार, शोभा मत्तीवाडे आदी उपस्थित होते.