कुडाळ / प्रतिनिधी
Mill workers leader Dinkar Masge passed away
पिंगुळी गुढीपुर येथील रहिवासी व गिरणी कामगार संघटक आणि नेते दिनकर सखाराम मसगे (७१ ) यांचे गुरुवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ५ मे रोजी सकाळी ९ वाजता पिंगुळी गुढीपुर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत. बॉम्बे डाइंग कंपनीत ते नोकरीला होते. गिरणी संपा नंतर ते पिंगुळी येथील आपल्या गावी वास्तव्यास आले. मिल मजदुर संघाचे मुख्य संघटक होते.काही काळ त्यानीं या संघटनेचे सचिव म्हणून काम केले होते.या संघाच्या माध्यमातून देशोधडीला लागलेल्या गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्यानीं स्वतःला झोकून देत काम केले. मोर्चातून गिरणी कामगारांच्या प्रश्नाचा आवाज मंत्रालया पर्यंत पोहोचविला.प्रत्येक तालुक्यात या कामगाराचे मेळावे घेऊन वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करीत.या कामगारांना मोफत घरे मिळाली पाहिजेत.
यासाठी त्यांचा लढा असायचा.ठाकर समाजाच्या उन्नतीसाठी साठी त्यांचा सहभाग असायचा.समाजाच्या प्रश्नासाठी शासन पातळीवर पाठपुरावा केला होता.मुबई ठाकर समाजाचे ते माजी कार्याध्यक्ष होते. शासनाने गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. कला,क्रीडा प्रेमी व्यक्तिमत्व होते.कामगार मंडळाच्या एकांकिका स्पर्धा मधून अभिनयाची प्रथम क्रमांकाची पारितोषिके त्यांनी मिळविली होती.त्यांना लेखनाची आवड होती. भडगाव बुद्रुक येथील मुबई वासियांना एकत्र करून पतपेढी स्थापन करण्यात त्यांचा पुढाकार होता.भडगाव येथे शैशनिक उठाव करून बालवाडी सुरू केली.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, दोन मुली,सून,जावई,दोन भाऊ,भावजय ,पुतणे,पुतण्या,नातवंडे,असा मोठा परिवार आहे.पणदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओषध निर्माता पराग मसगे यांचे ते वडील, तर पिंगुळीचे माजी पोलीस पाटील गणपत मसगे व पांग्रड येथील विद्यामंदिर चे सेवानिवृत्त कर्मचारी विनायक मसगे यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.