वृत्तसंस्था/ दुबई
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने फेब्रुवारी महिन्यातील उत्कृष्ट पुरुष खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकित खेळाडूंच्या नावांची घोषणा केली आहे. सध्या चालू असलेल्या ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या बॉर्डर-गावसकर मालिकेत भारताने जी प्रभावी सुऊवात केली त्यात मोठा वाटा राहिलेला अष्टपैलू रवींद्र जडेजा प्रथमच या यादीत झळकला आहे.
हॅरी ब्रूकने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी चालूच ठेवली असून गेल्या महिन्यात न्यूझीलंडमध्ये इंग्लंडच्या मालिकेदरम्यान आणखी काही प्रभावी खेळी केल्यामुळे त्याला या पुरस्कारासाठी पुन्हा नामांकन मिळाले आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये त्याला हा पुरस्कार प्राप्त झाला होता. सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूसाठीच्या शर्यतीतील अंतिम नाव वेस्ट इंडिजचा फिरकीपटू गुडाकेश मोती याचे आहे. त्याने झिम्बाब्वेमधील कसोटी मालिकेदरम्यान विक्रमी कामगिरी केली.
भारताचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने दुखापतीमुळे काही काळ बाहेर राहावे लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणक्यात पुनरागमन केलेले आहे. नागपूर येथील पहिल्या कसोटीत जडेजाने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या 5 फलंदाजांना 47 धावांच्या बदल्यात बाद केले. त्यानंतर यजमान संघ अडचणीत असताना 70 धावा काढण्याबरोबर रोहित शर्मा आणि अक्षर पटेल यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भागीदारी केली. दुसऱ्या डावात त्याने 34 धावा देऊन घेतलेल्या 2 बळींमुळे ऑस्ट्रेलियाला डावाने पराभूत व्हावे लागण्यास महत्त्वपूर्ण हातभार लागला.
जडेजाने दिल्ली कसोटीत पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक धावा काढणाऱ्या उस्मान ख्वाजाचा महत्त्वपूर्ण बळी घेतला आणि चांगली फलंदाजीही करताना पाचव्या गड्यासाठी 59 धावांची भागीदारी केली तसेच महत्त्वपूर्ण 26 धावा केल्या. मात्र त्याची सर्वोत्तम कामगिरी दुसऱ्या डावात झाली. त्याच्या फिरकीने 42 धावांत घेतलेल्या 7 बळींमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव 113 धावांवर संपुष्टात आला.