पेढे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण,
चौपदरीकरणातील कंत्राटदार कंपन्यांची बेपर्वाई
चिपळूण/प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील डोंगरात सुरू असलेल्या खोदाईतील 2 दगड शनिवारी सकाळी पायथ्याशी वसलेल्या पेढे बौध्दवाडीतील भर लोकवस्तीत एका घराजवळ आले. यात साहित्याचे किरकोळ नुकसान झाले असले तरी या प्रकारामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. गतवर्षी एका घरावर दगड कोसळल्यानंतरही महामार्ग कंत्राटदार कंपनीची सुरक्षिततेबाबतची बेपर्वाई सुरूच असल्याचे दिसत आहे.
शनिवारी डोंगरातून ज्या ठिकाणाहून दगड खाली आला, त्या ठिकाणी संरक्षक भिंतीची उभारणीच नव्हती. कोसळलेला दगड एका घराजवळ येऊन पडताना तेथे ठेवण्यात आलेल्या साहित्याची मोडतोड होऊन नुकसान झाले आहे.