एससीओ परिषदेदरम्यान होणार द्विपक्षीय संबंधांवर चर्चा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उझ्बेकिस्तानात चालू आठवडय़ात होणाऱया एससीओ परिषदेत सामील होणार आहेत. परिषदेत भाग घेण्यासह पंतप्रधान मोदी हे काही द्विपक्षीय बैठकांमध्ये सामील होतील अशी माहिती विदेश मंत्रालयाने दिली ओ. अशा स्थितीत आता सर्वांच्या नजरा पंतप्रधान मोदी तसेच चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या संभाव्य भेटीवर लागून राहिल्या आहेत.
दोन्ही नेत्यांदरम्यान द्विपक्षीय चर्चा झाल्यास प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावानंतर दोन्ही पहिल्यांदाच आमने-सामने येत चर्चा करणार आहेत. मोदी आणि जिनपिंग यांच्यातील संभाव्य चर्चेमुळे भारत-चीन संबंधांमधील तणाव कमी करण्यास मदत होणार आहे.
एससीओ परिषदेत नरेंद्र मोदी यांच्यासह रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग तसेच अन्य सदस्य देशांचे प्रमुख भाग घेणार आहेत. उझ्बेकिस्तानचे अध्यक्ष शावकात मिर्जियोयेव्ह यांच्या आमंत्रणावर पंतप्रधान मोदी हे समरकंद येथे होणाऱया शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. 15-16 सप्टेंबर रोजी ही परिषद पार पडणार आहे.
परिषदेत मागील दोन दशकांमधील एससीओच्या कार्यांची समीक्षा करण्यासह भविष्यात बहुउद्देशीय सहकार्यावरही चर्चा होणार आहे. क्षेत्रीय तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्दय़ांवरही परिषदेत चर्चा होणार असल्याचे विदेश मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.