स्कूल असोसिएशनच्या सूचना : शाळांनी वाजवी फी आकारण्याचा सल्ला
बेळगाव : खासगी शाळांनी पुढील वर्षाच्या शैक्षणिक प्रवेशाला सुरुवात केली आहे. काही शाळांनी फीमध्ये भरमसाट वाढ केल्याचे निदर्शनास आल्याने पालकांमधून नाराजीचा सूर उमटत होता. त्यामुळे राज्यातील स्कूल असोसिएशनने सर्व शाळांना 10 ते 15 टक्क्यांपेक्षा अधिक फी वाढ करू नये, अशा सूचना केल्या आहेत. असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ प्रायमरी अॅण्ड सेकंडरी स्कूल ऑफ कर्नाटका या संस्थेचे सेक्रेटरी डी. शशिकुमार यांनी यासंदर्भात सर्व खासगी शाळांना सूचना केल्या आहेत. राज्यातील शाळांना फीसंदर्भात पूर्वीचे आदेश मानण्याची गरज नसली तरी शाळांनी वाजवी फी आकारण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मागील दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे फी वाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे यावर्षी फी वाढ करण्याचा निर्णय शाळांनी घेतला आहे. परंतु फी वाढ करताना विद्यार्थी व पालकांचा विचार करूनच करण्याचा सल्ला असोसिएशनतर्फे देण्यात आला आहे. काही शाळांनी खर्च परवडत नसल्याने फी वाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले आहे. फी वाढ केली जाणार असली तरी याचा फटका गरीब विद्यार्थ्यांना बसणार आहे. आधीच अनेक पालकांची कोरोनामध्ये नोकरी गेली आहे. अनेकांचे व्यवसाय बंद आहेत. अशा परिस्थितीत फी वाढ केल्यास गरीब विद्यार्थी खासगी शाळेत जाणे कठीण होणार आहे. पालकांना परवडले नाही तर ते इतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दाखल करतील. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फी वाढ करताना सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा विचार करावा, अशी मागणी होत आहे.