संशयित हल्लेखोरासह 5 जणांचा मृत्यू ः एक जखमी
वृत्तसंस्था/ टोरंटो
कॅनडाची राजधानी टोरंटोमधील वॉघन येथे एका इमारतीत बेछूट गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांशी झालेल्या संघर्षात संशयित हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे. यॉर्क रिजनल पोलीस प्रमुख जेम्स मॅकस्वीन यांनी या घटनेत एक व्यक्ती जखमी झाल्याचे सांगितले आहे. संबंधित परिसरातील सर्व नागरिकांना घरातच थांबण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.
गोळीबार अन् संघर्षानंतर इमारत रिकामी करविण्यात आली. इमारतीतील एकाहून अधिक युनिट प्रभावित झाले आहेत. स्थिती नियंत्रणात असून आता परिसरातील लोकांना कुठलाच धोका नसल्याचे पोलीस प्रमुखांनी सांगितले आहे.
गोळीबारानंतरच दृश्य अत्यंत भयानक होते. गोळीबार करणारा हल्लेखोर याच इमारत किंवा परिसरातील होता का याबद्दल कुठलीच माहिती मिळालेली नाही. या घटनेची चौकशी ओंटारियोतील स्पेशल इन्व्हेस्टिगेशन युनिट करत आहे. ज्या गुन्हय़ांमध्ये अधिक लोक जखमी किंवा त्यांचा मृत्यू झाल्यास या विभागाकडून चौकशी केली जात असल्याचे मॅकस्वीन यांनी सांगितले आहे.
केवळ टोरंटोच नव्हे तर पूर्ण कॅनडात मास शूटिंगचा प्रकार घडणे दुर्लभ आहे. टोरंटोला जगातील सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक मानले जाते. अमेरिकेप्रमाणे गन हिंसेच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याची भीती कॅनडातील लोकांमध्ये निर्माण झाली आहे.
गोळीबाराच्या घटनेनंतर वॉघन शहराचे महापौर स्टीवन डेल डय़ुका यांनी घटनास्थळी पोहोचलेल्या शूर पोलीस अधिकाऱयांचे कौतुक केले आहे. स्थिती सुरक्षित ठेवण्यासाठी हे पोलीस अधिकारी काम करत आहेत. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त करतो असे महापौरांनी म्हटले आहे.