पाकिस्तानसोबतच्या वादावर पंतप्रधान मोदींचे महत्त्वाचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी जपानमधील हिरोशिमा येथे पोहोचले आहेत. तीन देशांच्या 6 दिवसीय दौऱ्याकरता रवाना होण्यापूर्वी मोदींनी भारत-चीन सीमा वाद आणि पाकिस्तानसोबतच्या संबंधांवरून एका मुलाखतीत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. भारत सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी पूर्णपणे तयार आणि प्रतिबद्ध आहे. चीनसोबतच्या सामान्य द्विपक्षीय संबंधांसाठी सीमावर्ती भागांमध्ये शांतता असणे आवश्यक असल्याचे मोदींनी निक्केई एशियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
भविष्यात भारत-चीन संबंधांचा विकास केवळ परस्पर समनन, परस्परांविषयी संवेदनशीलता आणि परस्पर हितांवर आधारित होऊ शकतो. संबंध सुरळीत करण्यात आल्यास व्यापक भाग तसेच जगाला लाभ होणार असल्याचे मोदींनी मुलाखतीत नमूद केले आहे.
भारत पाकिस्तानसोबत सुरळीत आणि शेजाऱ्याप्रमाणे संबंध इच्छितो. परंतु दहशतवाद आणि शत्रुत्वापासून मुक्त एक अनुकूल वातावरण निर्माण होणे याकरता आवश्यक आहे. यासंबंधी पाऊल उचलण्याची जबाबदारी पाकिस्तानची असल्याची भूमिका मोदींनी मुलाखतीत मांडली आहे.
रशिया-युक्रेन युद्ध
रशिया-युक्रेन युद्धात भारत मध्यस्थी करू शकतो असा प्रश्न पंतप्रधान मोदींना विचारण्यात आला होता. युक्रेन वादावर भारताची स्थिती स्पष्ट आणि अटळ आहे. भारत शांततेच्या बाजूने उभा आहे आणि स्वत:च्या भूमिकेवर ठाम राहणार आहे. मुलभूत गरजा, विशेषकरून अन्न, इंधन आणि खतांच्या वाढत्या किमतींमुळे आव्हानांना सामोरे जाणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांसोबत आम्ही संपर्क राखून आहोत असे मोदींनी प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या विश्वासार्हता आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत राहणार आहेत. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य होण्यापासून रोखण्यात आल्याचे मोदींनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले आहे.
जी-7 च्या परिषदेत सहभाग
पंतप्रधान मोदी हे जी-7 च्या शनिवारी होणाऱ्या शिखर परिषदेत आमंत्रित सदस्य म्हणून सहभागी होणार आहेत. या परिषदेदरम्यान मोदी हे युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांच्याशी चर्चा करू शकतात. जी-7 च्या शिखर परिषदेत रशियाविरोधी प्रस्ताव संमत केला जाण्याची दाट शक्यता आहे. जी-7 च्या शिखर परिषदेचे यजमानपद यंदा जपानकडे आहे. विकसित देशांच्या या समुहात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका हे सदस्य आहेत. तर भारताला यात अतिथी देश म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.