उमेदवारांच्या होणार मुलाखती
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव दक्षिण मतदारसंघासाठीची निवड कमिटीची स्थापना केली असून, बुधवार दि. 12 रोजी या कमिटीची प्राथमिक बैठक होणार आहे. दुपारी 3 वा. मराठा मंदिर येथे निवड कमिटीच्या बैठकीसोबत उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या बैठकीदरम्यान कमिटीतील 87 सदस्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. उमेदवार निवड प्रक्रियेसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असून, उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीही मागे नसून बेळगाव दक्षिण व उत्तर या दोन्ही मतदारसंघांसाठी निवड कमिटीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. लवकरच सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असून, उमेदवारांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतर मतदान घेऊन सर्व समावेशक उमेदवार दिला जाणार आहे. निवड कमिटीची बैठक बुधवार दि. 12 रोजी होणार आहे. यानंतर उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
ग्रामीण मतदारसंघाच्या आज उमेदवाराची निवड
ग्रामीण मतदारसंघामध्ये म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यासाठी पाच जणांनी अर्ज दाखल केले होते. त्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. बुधवारी निवड समिती एका उमेदवाराचे नाव जाहीर करणार आहे. यासाठी सकाळी 10 वाजता केवळ निवड कमिटीची बैठक घेतली जाणार आहे. त्याठिकाणी इतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असे तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील यांनी सांगितले आहे. मराठा मंदिर येथे ही बैठक होणार आहे. उमेदवार निवडीसाठी 131 जणांची कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्या कमिटीची बैठक असून त्यामध्ये सर्वानुमते एका उमेदवाराचे नाव निश्चित करून ते जाहीर करण्यात येणार आहे. कमिटी व्यतिरिक्त इतर कोणालाही त्याठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवार व त्यांच्या समर्थकांनीही त्याठिकाणी उपस्थित राहू नये, असे सांगण्यात आले आहे.