वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहमद सिराजने आयसीसीच्या वनडे ताज्या गोलंदाजांच्या मानांकन यादीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. या ताज्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाच्या हॅझलवूडला आपले अग्रस्थान काय राखले असून न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट दुसऱ्या स्थानावर आहे. आहे.
ऑस्ट्रेलियाच्या हॅझलवूडने 2017 साली आयसीसीच्या वनडे गोलंदाजांच्या मानांकन यादीत दुसरे स्थान मिळवले होते. त्यानंतर 2022 च्या ऑगस्टपर्यंत तो दुसऱ्या स्थानावरच राहिला होता. आता मात्र हॅझलवुडने पहिल्यांदा अग्रस्थान मिळवले आहे. या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आणि भारताचा मोहमद सिराज हे संयुक्त तिसऱ्या स्थानावर आहेत. विंडीजचा जोसेफ 11 व्या, भारताचा मोहमद शमी 28 व्या तर हॉलंडचा क्लेसन 52 व्या स्थानावर आहे.
वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताच्या शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी अनुक्रमे पाचवे आणि सातवे स्थान कायम राखले असून कर्णधार रोहित शर्मा नवव्या स्थानावर आहे.
न्यूझीलंडच्या केन विलियम्सनने कसोटी क्रिकेटच्या फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. लंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विलियम्सनने दमदार द्विशतक झळकवले होते. विलियम्सनने कसोटीत आतापर्यंत 6 द्विशतके झळकवली असून भारताच्या कोहलीने 7 द्विशतके नोंदवली आहेत.