चिप फॅक्टरी उभारण्याची योजना लांबणीवर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतात चिप फॅक्टरी उभारण्याची वेदांताची योजना लांबणीवर पडताना दिसत आहे. याचे कारण असे की, वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर निर्मिती कारखान्यासाठी तंत्रज्ञान भागीदार म्हणून झालेल्या वाटाघाटी दरम्यान अडचणी जाणवल्याचे कळते. तंत्रज्ञान हस्तांतरणाचा तपशील, भागीदारीचा कालावधी आणि प्रत्येक कंपनीने गुंतवायची रक्कम याबाबत करार नसल्यामुळे बोलणी पुढे जात नसल्याचे चित्र आहे. संयुक्त विद्यमाने होणाऱ्या कारखान्याच्या उपक्रमात अनेक अडथळे येत असल्याची माहिती आहे. त्याबाबत दोन्ही कंपन्यांचे एकमत होणे बाकी आहे. यामध्ये वेदांतने पुढाकार घ्यावा आणि अधिक गुंतवणूक करावी अशी इच्छा व्यक्त करण्यात आल्याचे सांगितले जाते. सेमीकंडक्टर इन्सेंटिव्ह प्लॅनसाठी अर्जदारांनी चिप उत्पादनातील कौशल्य स्पष्टपणे दाखवणे अत्यावश्यक आहे. या अगोदर, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की वेदांत आणि फॉक्सकॉनकडे आवश्यक अनुभव नाही आणि त्यांना तंत्रज्ञान आणि उत्पादनाची माहिती असलेल्या तिसऱ्या भागीदाराची आवश्यकता असल्याचेही स्पष्ट केले होते.