फोंडा पोलीस, अंत्रुज पत्रकार संघाचा पुढाकार
प्रतिनिधी /फोंडा
दूधसागर व खांडेपार नदीत बुडून मृत्यू होण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमिवर लोकांना सतर्क करण्यासाठी फोंडा पोलीस व अंत्रुज पत्रकार संघातर्फे जागृती फलक उभारण्यात आले आहेत. कोडार येथील वैद्य फार्मजवळ व ओकांब धारबांदोडा येथील नदी काठच्या धोकादायक स्थळावर हे फलक उभारुन सहलीसाठी येणाऱयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
फोंडय़ाचे पोलीस उपअधिक्षक सी. एल. पाटील व निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्याहस्ते हे फलक उभारण्यात आले. यावेळी साहाय्यक उपनिरीक्षक जितेंद्र गावडे, अंत्रुज पत्रकार संघाचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद पै, सचिव सदानंद सतरकर, उपाध्यक्ष विवेक प्रभू तसेच इतर पदाधिकारी व पोलीस कर्मचारी उपसिथत होते. कोडार व ओकांब येथील नदीवर सहलीसाठी आलेल्या अनेक तरुणांचा गेल्या काही वर्षांमध्ये बुडून म्त्यू झाला आहे. त्यापैकी बहुतेकजण 18 ते 30 वर्षे वयोगटातील आहेत. अशा घटना वारंवार घडूनही त्यापासून बोध घेतला जात नाही. आडवाटेने येणाऱया लोकांना दरवेळी पोलीस ठेवून आवरणे शक्य नाही. मुळात या जागा पोहण्यासाठी नाहीत. आंघोळीसाठी पाण्यात उतरणाऱयांना संभाव्य धोक्यापासून सतर्क करण्यासाठी फलक उभारण्यात आल्याचे सी. एल. पाटील यांनी सांगितले. नदीवर सहलीसाठी येताना पाण्यात उतरण्याचा धोका पत्करु नये. प्रत्येकाचा जीव मौल्यवान असून त्याची स्वतःच काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.