प्रतिनिधी/ बेळगाव
शनिवारी पोलीस व निमलष्करी दलाच्या जवानांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात पथसंचलन केले. अक्षय्य तृतीया, रमजान, शिवबसव जयंती बंदोबस्ताचा ताण असतानाही पोलिसांनी जिल्ह्यात शक्तिप्रदर्शन केले.
मुडलगी, गोकाक तालुक्यातील ममदापूर, उप्पारट्टी, मालदिन्नी येथे एसएसबी व केएसआरपी पथकांचे पथसंचलन झाले. यादरम्यान निमलष्करी जवान व पोलीस अधिकाऱ्यांचे गावकऱ्यांनी पुष्पहार घालून गावात स्वागत केले. त्यामुळे पथसंचलनात भाग घेतलेल्या पोलिसांचा उत्साह द्विगुणित झाला.
यमकनमर्डी येथेही पथसंचलन करण्यात आले. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात पथसंचलन करण्यात येत असून भयमुक्त वातावरणात निवडणूक व मतदानाची प्रक्रिया पार पाडावी, यासाठी पोलिसांचे शक्तिप्रदर्शन सुरू आहे.