अनेकदा रुग्णांचा होतो मृत्यू
विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे, जवळपास प्रत्येक आजारावर आता औषध आहे. तरीहीत जगात अशा अनेक पारंपरिक पद्धती आहेत, ज्यावर लोकांचा विश्वास असतो. कंबो याचपैकी एक आहे. यात रुग्णांना बेडकांचे विष दिले जाते. अलिकडेच या उपचारपद्धतीमुळे दोन रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. तरीही लोक याच माध्यमातून स्वत:वर उपचार करवून घेत आहेत. अमेझॉनच्या देशांमध्ये नैसर्गिक चिकित्सेच्या स्वरुपात प्रसिद्ध या प्रथेद्वारे अनेक आजार बरे होतात असे मानले जाते. कर्करोग, वंध्यत्व, नैराश्य आणि अल्झायमर यासारखे आजार त्वरित बरे होतात असा दावा आहे.
या प्रथेमध्ये रुग्णाला प्रथम एक लिटर पाणी किंवा कसावा सूप प्यायला देतात. काही वेळानंतर आगीत तापलेल्या एका रॉडद्वारे खांद्यानजीक छिद्र पाडले जाते. या छिद्रात बेडकाचे विष भरले जाते. विषाच्या संपर्कात स्नायू येतात संबंधित व्यक्ती तडफडू लागतो. हे विष रक्ताच्या माध्यमातून पूर्ण शरीरात पसरत असते. रुग्णाला उलटी होऊ लागते. वारंवार मूत्रविसर्जन, चक्कर येणे, उच्च रक्तदाब आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागतो. हा प्रकार फारतर 5-30 मिनिटांसाठी होत असतो. अनेकदा लोक कित्येक तासापर्यंत त्रस्त असतात.
अनेक देशांमध्ये बंदी
त्यानंतर शरीरातून विष बाहेर काढण्यासाठी पाणी किंवा चहा पाजला जातो. लोकांना अनेक तासापर्यंत नदीच्या पाण्यात पहुडण्यास सांगितले जाते. तरीही लोक बेहाल राहतात. अनेकदा तर बेशुद्ध देखील होतात. कंबो मूळ स्वरुपात विष असल्याने काही देशांमध्ये यावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु अमेरिकेत या पद्धतीला कायदेशीर मान्यता आहे. ही प्रथा किती उपयुक्त आहे यावर अद्याप संशोधन झालेले नाही. परंतु हजारो लोक आज देखील या पद्धतीद्वारे स्वत:वर उपचार करवून घेत आहेत.
ही पद्धती धोकादायक असल्याने अलिकडेच ऑस्ट्रेलियात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. नताशा लेचनर नावाच्या महिलेला पाठदुखीचा त्रास होता, औषधांचे सेवन केल्यावरही हा त्रास कमी होत नव्हता. कुणीतरी तिला या पद्धतीद्वारे उपचार करविण्याचा सल्ला दिला होता. कंबोमुळे ती काही क्षणांमध्येच बेशुद्ध होत नंतर मृत्युमुखी पडली होती. अशाच प्रकारे 46 वर्षीय जराड एंटोनोविच उपचारानंतर आजारी झाले होते, दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला होता.