डॉक्टरांना विकता येणार नाही महागडी औषधे अन् उपकरणे
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रुग्णांकडून मनमानी पद्धतीने पैसे वसूल करणाऱया डॉक्टरांना चाप लावण्याची तयारी नॅशनल मेडिकल कमिशनने (एनएमसी) केली आहे. एमएमसीने अलिकडेच एका आचारसंहितेचा मसुदा जारी केला असून यानुसार डॉक्टरांना आता रुग्णांना महागडी ब्रँडेड औषधे विकता येणार नाहीत. परंतु डॉक्टरांना स्वतःच्या रुग्णांना औषधे विकण्यास मनाई नसणार आहे. एनएमसीनुसार डॉक्टर आता उघडपणे दुकान चालवू शकत नाहीत तसेच वैद्यकीय उपकरणेही विकू शकत नाहीत.
नव्या तरतुदीनुसार डॉक्टर अशीच औषधे रुग्णांना विकू शकतात, ज्याचा उपचार ते स्वतः करत आहेत. याचबरोबर रुग्णांचे शोषण होणार नाही याची काळजी डॉक्टरांना घ्यावी लागणार आहे. एनएमसीने डॉक्टरांसाठीच्या व्यावसायिक आचारसंहितेत बदल करत अनेक प्रकारच्या तरतुदी केल्या आहेत. एनएमसीच्या या तरतुदींनंतर छोटय़ा शहरांमधील रुग्णांना सर्वाधिक लाभ होणार आहे. छोटय़ा शहरांमध्ये क्लीनिक चालविणारे काही डॉक्टर्स स्वतःचेच दुकान सुरू करून रुग्णांना औषधे विकत असल्याचे दिसून आले आहे. त्याला आळा बसणार आहे.
नवी मार्गदर्शक तत्वे
उपचाराच्या नावावर छोटी शहरे आणि गावांमध्ये गरीब लोकांना अधिक पैसे खर्च करावे लागतात. परंतु आता एनएमसीकडून करण्यात आलेल्या नव्या बदलांमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परंतु क्लीनिक चालविणाऱया डॉक्टरांना स्वतःच्या रुग्णांसाठी स्वतःकडील औषधे विकण्यास अनुमती असेल. स्वतःकडून उपचारात सुचविण्यात आलेली औषधेच त्यांना विकता येणार आहेत. याचबरोबर एनएमसीने डॉक्टरांना आता प्रिस्क्रीप्शनवर नोंदणी क्रमांक नमूद करण्यासह शुल्क पूर्वीच सांगण्याचा निर्देश दिला आहे.
भेदभाव करता येणार नाही
धर्माच्या आधारावर कुठल्याही रुग्णावर उपचार करण्यास नकार देता येणार नाही. कुटुंबनियोजन प्रकरणी पती आणि पत्नी दोघांचीही अनुमती घेणे आता अनिवार्य असणार आहे. देशात स्वातंत्र्यापूर्वीपासून अनेक असे कायदे आहेत, ज्यात डॉक्टरांना रुग्णांना औषधे देण्याची अनुमती प्रदान करण्यात आली आहे. परंतु त्या काळात देशात औषधांच्या दुकानांची संख्याही कमी असायची. जागतिक आरोग्य संघटना देखील याची अनुमती देते. अनेक डॉक्टर रुग्णांच्या घरी जात त्यांच्यावर उपचार करत असल्याने ही व्यवस्थाही महत्त्वाची आहे. मात्र या व्यवस्थेतील त्रुटी आणि गैरप्रकार होण्याची शक्यता दूर करणे आवश्यक असल्याने नवी मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात येणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.