अध्यक्ष बिडेन यांचा आरोप ः लोकांचे अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत 8 नोव्हेंबर रोजी होणाऱया मध्यावधी निवडणुकीपूर्वी अध्यक्ष जो बिडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला आहे. ट्रम्प आणि त्यांची रिपब्लिक पार्टी देशासाठी धोकादायक असल्याचे बिडेन यांनी म्हटले आहे.
ट्रम्प आणि त्यांचे समर्थक अमेरिकेच्या लोकशाहीचे शत्रू आहेत. ट्रम्प देशाला मागे नेऊ इच्छित आहेत. लोकांकडे कुठल्याही प्रकारचा अधिकार नसलेला देश ते तयार करू पाहत असल्याचा आरोप बिडेन यांनी केला आहे.
अमेरिका म्हणजे लोकशाहीची हमी असे आम्ही दीर्घकाळापासून म्हणत आहोत, परंतु आता असे चित्र नाही. सद्यकाळात समानता आणि लोकशाहीवर हल्ले होत आहेत. आम्हाला आवाज उठवावा लागेल, लोकशाही वाचवावी लागेल असे बिडेन यांनी फिलाडेल्फिया येथील एका भाषणादरम्यान म्हटले आहे. तसेच त्यांनी ट्रम्प यांच्या ‘मेक अमेरिका गेट अगेन’च्या विचारसरणीला पाठिंबा देणाऱयांवर टीका केली आहे.
अमेरिकेत राजकीय हिंसाचाराला स्थान नसल्याचे बिडेन म्हणाले. मागील वर्षी कॅपिटल हिल येथे झालेल्या हिंसेसाठी त्यांनी अप्रत्यक्षपणे ट्रम्प यांना जबाबदार ठरविले आहे. अमेरिकेत 6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल हिल (अमेरिकेची संसद) येथे ट्रम्प यांच्या समर्थकांनी हल्ला केला होता. ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव झाल्याने ते नाराज झाले होते.
नोव्हेंबरमध्ये होणाऱया निवडणुकीची प्रायमरी मे महिन्यात पार पडली आहे. अमेरिकेच्या निवडणुकीत प्रायमरीदरम्यान दोन्ही पक्षांचे उमेदवार जनतेदरम्यान जातात आणि लोकप्रियतेच्या आधारावर स्वतःच्या पक्षाची उमेदवारी प्राप्त करत असतात. सर्वेक्षणात अध्यक्ष बिडेन यांची डेमोक्रेटिक पार्टी ही ट्रम्प यांच्या रिपब्लिक न पार्टीच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचे दिसून आले आहे.
सर्वेक्षणात विविध मुद्दय़ांवर डेमोक्रेटिक पार्टीला 44 टक्के लोकांचे समर्थन मिळाले. तर रिपब्लिक पार्टीनला 47 टक्के लोकांचे समर्थन प्राप्त झाले आहे. वाढत्या महागाईमुळे लोकांमध्ये मोठी नाराजी आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळविण्यास रिपब्लिकन पार्टी अधिक प्रभावी ठरणार असल्याचे 41 टक्के लोकांचे मानणे आहे.