ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांची 12 मे रोजी भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी कट शिजला. मात्र, तळेगाव पोलिसांनी हा कट उधळून लावत दोघांना अटक केली. या दोघांकडून 4 पिस्तूल आणि 14 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
शरद मुरलीधर साळवी (वय 30, रा. धनगरबाबा मंदिरामागे काळेवाडी, पिंपरी) आणि प्रमोद सोपान सांडभोर (33, रा. हरणेश्वरवाडी, तळेगाव दाभाडे) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
साळवी व सांडभोर हे सराईत गुन्हेगार आहेत. ते तळेगाव दाभाडे बस स्टॅन्डजवळ खूनाच्या तयारीत आहेत, अशी खबर दरोडा विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार या पथकाचे पीआय जितेंद्र कदम, एपीआय अंबरीश देशमुख आदींनी त्या परिसरात सापळा लावला. आरोपी हे निळय़ा रंगाच्या मोटारीतून खाली उतरले. त्यांच्या कंबरेला पिस्तूले होती. पोलिसांचा सुगावा लागताच ते दोघे वेगवेगळय़ा दिशेने पळत सुटले. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. यावेळी त्यांच्याकडे दोन पिस्तूले आणि 4 जिवंत काडतूसे सापडली. तर, मोटारीच्या झडतीत आणखी दोन पिस्तूले आणि 10 जिवंत काडतुसे मिळून आली.
या दोघांनी आवारेंच्या खूनाचा बदला घेण्यासाठी मध्यप्रदेशातून पिस्तूल आणि काडतुसे आणली होती. पण, त्यांचा प्लॅन तडीस जाण्यापूर्वीच पोलिसांनी तो उधळून लावला. या कटामध्ये आणखी तीन जण सहभागी असल्याचे समोर आले आहे. तळेगाव पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.