ऑनलाईन टीम / तरुण भारत :
खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या 2 मुली बुडाल्याची दुर्देवी घटना घडली. तर स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे 7 मुलींना वाचविण्यात यश आले. गोऱ्हे खुर्द (ता. हवेली) गावच्या हद्दीत आज सकाळी ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या पाण्यात आज सकाळी नऊ मुली पोहण्यासाठी उतरल्या होत्या. पाण्याचा अंदाज न आल्याने या सर्व मुली पाण्यात बुडू लागल्या. दरम्यान, जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी मुलींना वाचविण्यासाठी धाव घेतली. 7 मुलींना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले. मात्र, दुर्देवाने दोन मुली पाण्यात बुडाल्या. स्थानिकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली.
हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, मुलींचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. बुडालेल्या मुली साधारण 16 ते 17 वयाच्या आहेत.