विमान मंत्रालयाकडून उन्हाळी वेळापत्रक जाहीर : दिल्ली-बेळगाव मार्गावर विमानफेरी मंजूर
बेळगाव : विमान मंत्रालयाने नुकतेच विमानांचे उन्हाळी वेळापत्रक जाहीर केले. यामध्ये बेळगावच्या वाट्याला दोन नव्या विमानसेवा मंजूर झाल्या आहेत. उन्हाळी वेळापत्रक दि. 26 मार्च ते 28 ऑक्टोबर या कालावधीसाठी असणार आहे. यामुळे बेळगावच्या विमानसेवांमध्ये पुढील कालावधीत वाढ होण्याची शक्यता आहे. नागरी हवाई उ•ाण संचालनालयातर्फे शुक्रवारी उन्हाळी वेळापत्रक जाहीर करण्यात आले. इंडिगो, स्टार एअर व स्पाईस जेट या विमान कंपन्यांना 11 मार्ग देण्यात आले आहेत. संजय घोडावत ग्रुपच्या स्टार एअरलाईन्सला नवीन दोन मार्ग मंजूर करण्यात आले. बेळगाव-जयपूर व बेळगाव-बेंगळूर या मार्गावर विमानफेरी मंजूर झाली आहे. सध्या स्टार एअरलाईन्स मुंबई, अहमदाबाद, तिरुपती, जोधूपर, नागपूर, इंदोर, सूरत या शहरांना सेवा देत आहे. स्पाईस जेट विमान कंपनी बेळगावमध्ये पुन्हा एकदा परतण्याची चिन्हे आहेत. या कंपनीला दिल्ली-बेळगाव-दिल्ली या मार्गावर विमानफेरी मंजूर करण्यात आली आहे. यामुळे देशाच्या राजधानीला पोहोचणे अत्यंत सोयीचे होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून बेळगाव-दिल्ली विमानफेरीची मागणी सतत होत असल्यामुळे याची दखल घेत डीजीसीएने विमानफेरीला मंजुरी दिली.
नाशिक, पुणे प्रवाशांची नाराजी
बेळगाव-पुणे व नाशिक या मार्गावर विमानफेरी सुरू असताना प्रवासी संख्या उत्तम होती. परंतु अचानक या विमानफेऱ्या रद्द करण्यात आल्या. बेळगावहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्यामुळे उद्योजक, व्यापारीवर्गातून या विमानफेरीसाठी प्रयत्न होत होते. परंतु नुकत्याच जाहीर झालेल्या उन्हाळी वेळापत्रकात पुणे व नाशिक या शहरांचा समावेश नसल्याने या विमानफेऱ्यांसाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.