वळसंग / वार्ताहर
जत-सांगली रस्त्यावर दुचाकींची समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात तालुक्यातील वळसंग येथील राजेंद्र गुरबाळा मुचंडी वय 45 यांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजनेच्या सुमारास हा अपघात झाला.
अधिक माहिती अशी,वळसंग येथील राजेंद्र मुचंडी आपल्या पत्नी मुले व आई-वडिलांसमवेत संगतीर्थ येथील आपल्या मळ्यात राहतात. ते ऊस उत्पादक शेतकरी असून गेल्या वर्षी आपला ऊस केंपवाड साखर कारखान्याला पाठवला होता. साखर कारखान्यातून शेतकऱ्यांना दिवाळीसाठी साखर वाटप केले जाते. या साखर कारखान्याचे विभागीय कार्यालय कोकळे या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी साखर वाटपाचे काम चालू होते ते साखर आणण्यासाठी मुलगा आकाश व राजेंद्र दोघेही एचएफ डीलक्स MH -10.DB-4043 या गाडीवर दुपारी कोकळेला गेले. साखर घेऊन परतत असताना कोकळेपासून डफळापूर कडे येताना रस्त्यावर दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात राजेंद्र यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची जत पोलिसात उशिरा नोंद झाली आहे.