केरळमधील धक्कादायक घटना ः अंधश्रद्धा अन् पैशांचा हव्यास
वृत्तसंस्था/ त्रिरुवल्ला
केरळच्या त्रिरुवल्लामध्ये अंधश्रद्धेच्या जाळय़ात अडकलेल्या डॉक्टर दांपत्याने दोन महिलांचा गळा चिरून हत्या केली आहे. घरात धन आणि संपत्ती यावे म्हणून या दोन्ही महिलांचा बळी दिल्याचे या डॉक्टर दांपत्याने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले आहे. गळा चिरून ठार केल्यावर दोन्ही महिलांना दफन करण्यात आले होते आणि याकरता एका तस्कराने त्यांना मदत केली होती. पोलिसांनी तिन्ही आरोपींना मंगळवारी अटक केली आहे.
त्रिरुवल्ला येथे राहणारे डॉक्टर भागवत दीर्घकाळापासून आर्थिक संकटाला तोंड देत होते. त्यांची पत्नी लीलाने पेरंबवूरमध्ये राहणाऱया शिहाबशी संपर्क साधला होता. त्याने मानवी बळी दिला तरच देवाची कृपा होईल असे म्हणत दोन महिलांचा बळी देण्यास सांगितले होते. तसेच त्याने बळीसाठी महिलांची व्यवस्था आपणच करणार असल्याचे डॉक्टर दांपत्याला कळविले होते.
लीलाने फेसबुकच्या माध्यमातून शिहाबशी संपर्क साधला. त्याने कलाडी आणि कदवंतरा येथे राहणाऱया दोन महिलांना पैसे आणि कामाचे आमिष दाखवून त्रिरुवल्लामध्ये आणले हेते. तेथून डॉक्टर दांपत्य आणि शिहाबने दोन्ही महिलांना पथनामथिट्टाच्या एलंथूर येथे नेले होते. तेथेच कथित पूजा केल्यावर दोन्ही महिलांचा बळी देण्यात आला. एलंथूरमध्येच दोन्ही महिलांचे मृतदेह पुरण्यात आले.
कदवंतरा येथील महिलेच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. पोलिसांना तिच्या मोबाइलचे अखेरचे लोकेशन त्रिरुवल्ला येथे दिसून आले होते. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर महिलेचा डॉक्टरशी संपर्क झाल्याचे समोर आले. पोलिसांनी डॉक्टर दांपत्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर गुन्हय़ाचा उलगडा झाला आहे.