सोदी अरेबियातील दोन तरुणींचा मृत्यू सध्या ऑस्ट्रेलियासाठी मोठीच डोकेदुखी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात एका हॉटेलमध्ये त्या वास्तव्यास होत्या. 7 जून 2022 या दिवशी त्यांचा त्याच हॉटेलात रहस्यमयी मृत्यू झाला. तो कसा झाला, याचे उत्तर आजही मिळालेले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांवर दबाव वाढत आहे. आत्महत्या किंवा हत्या या दोन्ही प्रकारांमध्ये त्यांचा मृत्यू बसत नाही, असेच आतापर्यंतच्या संशोधनातून दिसून येत आहे. मात्र, दोघींचा एकाचवेळी नैसर्गिक मृत्यू होण्याची शक्यता नसल्याने गूढ वाढत आहे.
आसरा अब्दुल्ला (वय 23) आणि अल्सेहिली अब्दुल्ला (वय 24) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचे मृतदेह वेगवेगळय़ा शयनकक्षात सापडले. या तरुणींचे कोणीही परिचित ऑस्ट्रेलियात नाहीत. त्या पर्यटनासाठी येथे आल्या असाव्यात, असा कयास होता. मृत्यूपूर्वी काही दिवस आधी एका वेलफेअर कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला होता. मात्र 7 जूनला त्यांचे मृतदेह सापडले. शवचिकित्सेतून त्यांचा मृत्यू एक महिना अगोदर झाला असावा, असा निष्कर्ष निघाला. त्यामुळे त्यांच्या मृत्यूच्या रहस्यात अधिकच भर पडली आहे. पुढील तपास चालू आहे.
या तरुणी समलिंगी संबंध ठेवणाऱया होत्या, अशी साक्ष हॉटेलात काम करणाऱया एका महिलेने दिली आहे. सौदी अरेबियामध्ये समलिंगी संबंधांना कठोर शिक्षा असल्याने त्या ऑस्ट्रेलियात आल्या असाव्यात. ऑस्ट्रेलियातून परत जाण्याची त्यांची इच्छा नव्हती, अशीही माहिती समोर येत आहे. एकंदर या मृत्यूंमुळे सिडनी शहरातील पोलिसांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.