30 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याची योजना तयार
वृत्तसंस्था / कीव्ह
रशियन क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांमुळे होत असलेले प्रचंड नुकसान पाहता युक्रेन ब्लॅकआउटचा मोठा निर्णय घेऊ शकतो. युक्रेनने राजधानी कीव्हला पूर्णपणे ब्लॅकआउट करण्याचा निर्णय घेतल्यास अधिकाऱयांना शहरातील 30 लाख रहिवाशांना अन्यत्र हलवावे लागणार आहे. कीव्हचे प्रशासन आपत्कालीन ब्लॅकआउटचा विचार करत आहे.
रशियाच्या सैन्याने युक्रेनमधील ऊर्जा विषयक सुविधांचे सुमारे 40 टक्के नुकसान केले आहे. 22 ऑक्टोबर रोजी युक्रेनमधील महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्पांवर रशियाने केलेल्या हल्ल्यांमुळे 14 लाखाहून अधिक घरांचा वीजपुरवठा ठप्प झाला होता. युक्रेनचे विद्युत ग्रिड पूर्णपणे कोलमडण्यापासून रोखण्यासाठी 7 क्षेत्रांमध्ये रोलिंग ब्लॅकआउट सुरू राहणार असल्याचे तेथील राष्ट्रीय ऊर्जा आयोगाने म्हटले आहे.
कीव्ह, चेर्निहाइव्ह, चर्कासी, जाइटॉमिर, सुमी, खारकीव्ह आणि पोल्टावा क्षेत्रात दिवसावेळी वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे. ग्रिड फेल होण्यापूर्वी कीव्हच्या अधिकाऱयांना किमान 12 तासांची पूर्वसूचना मिळण्याची शक्यता आहे. ग्रिड कोलडमण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचल्यास आम्ही लोकांना यासंर्बधी माहिती देण्यास सुरुवात करू असे कीव्ह महापालिकेचे सुरक्षा संचालक रोमन टकाचुक यांनी म्हटले आहे.
पुतीन यांच अल्टीमेटम
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी दक्षिण युक्रेनमधील खेरसॉन येथील नागरिकांना त्वरित अन्यत्र हलविण्यात यावे असे म्हटले आहे. फेब्रुवारी महिन्यात खेरसॉनच्या दक्षिण हिस्स्यावर रशियाने कब्जा केला होता. परंतु याला प्रत्युत्तर देत युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या सैन्यावर दबाव निर्माण केला आहे. या भागातील रशियाच्या सैन्याने ऑक्टोबर महिन्यापासून लोकांना बाहेर काढण्याचे कार्य हाती घेतले आहे.