वृत्तसंस्था/ लंडन
2022 च्या इंग्लीश कौंटी क्रिकेट हंगामातील उर्वरित सामन्यांसाठी मिडलसेक्स क्रिकेट क्लबने भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवबरोबर नुकताच नवा करार केला आहे. मिडलसेक्सने सोमवारी उमेश यादवशी करार केल्याची घोषणा या क्लबचे प्रमुख ऍलन कोलेन यांनी केली.
सध्या इंग्लंडमध्ये इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धा खेळविली जात आहे. या चालू वषीच्या हंगामात यादव आता मिडलसेक्स क्लबकडून प्रथमश्रेणी तसेच लिस्ट-अ दर्जाच्या सामन्यांमध्ये खेळणार आहे. नागपूरच्या 34 वषीय उमेश यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 134 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले असून त्यामध्ये 52 कसोटी, 77 वन डे आणि 7 टी-20 सामन्यात 273 गडी बाद केले आहेत. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये उमेश यादवने आतापर्यंत वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 650 पेक्षा अधिक बळी मिळविले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना उमेश यादवने 88 धावात 6 गडी अशी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. 2018 साली विंडीजविरुद्ध हैद्राबादमध्ये झालेल्या कसोटीसाठी भारतीय निवड समितीने उमेश यादवला भारतीय संघात स्थान दिले होते. पाकचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यापूर्वी मिडलसेक्स क्लबचे प्रतिनिधित्व करीत होता. पण आता तो मायदेशी परतल्याने मिडलसेक्सला दुसऱया वेगवान गोलंदाजाची कमतरता भासत होती. उमेश यादव ताशी 140 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करतो. तो चेंडू बऱयापैकी स्विंग करू शकतो. मिडलसेक्स क्लबतर्फे यादवचे या करारामुळे अभिनंदन करण्यात आले आहे.