उपजिल्हाधिकाऱयांकडून फलटण तहसिलदारांना तत्काळ कारवाईचा आदेश
गोडोली
घाडगेवाडी (ता. फलटण) येथे राजकीय वरदहस्त आणि शासकीय वरिष्ठ अधिकारी असलेल्या कुटुंबातील व्यक्तींनी गतवर्षांपासून अनाधिकृत खडी क्रशर सुरू केला होता. याला संपूर्ण गावाचा विरोध असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणूनही संबंधितांनी प्रदूषणाची खबरदारी न घेता मोठय़ा प्रमाणावर धुरळा उडवत आजूबाजूच्या परिसरातील शेतीचे नुकसान केले आहे. याविरोधात अर्ज, उपोषण करुनही दखल न घेणाऱया प्रशासनाविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी आमरण उपोषणाचा इशारा देताच महसूल उपजिल्हाधिकाऱयांनी तहसिलदारांना ते क्रशर सील करण्याचा दि. 13 रोजी आदेश दिला. हा लढा देणारे ग्रामपंचायत सदस्य रणजित घाडगे यांनी क्रशर कायमस्वरूपी बंद करण्यासाठी यशस्वी लढा देण्यासाठी प्रसंगी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे ‘तरुण भारत’ शी बोलताना सांगितले.
सुरवडीचा जावई आणि जलसंपदा विभागात वरिष्ठ अधिकारी असलेल्या व्यक्तींने पत्नी आणि मुलाच्या नावावर फलटण तालुक्यातील घाडगेवाडी आणि मलवडी गावाच्या हद्दीत नव्याने खडी क्रशर सुरू करण्याचा घाट घातला आहे. घाडगेवाडी हद्दीतील गट न.206 व लागून असलेल्या मलवडी गावच्या हद्दीतील गट नं.513/2 या गटामध्ये खडी क्रशर मशीनला परवानगी न देण्याबाबत ग्रामपंचायत सदस्य आणि काही शेतकऱयांनी अर्ज केले होते. सदर खडी मशीन कायमस्वरूपी बंद करण्याबाबतही फलटण तहसिलदार, प्रदुषण नियंत्रण मंडळाला निवेदन दिलेली होती. फलटण तहसिलदार आणि पोलिसांनी निवेदन देणाऱयालाच कायदाचा धाक दाखवून घायकुतीला आणले. मात्र भविष्यात गावाच्या उदरनिर्वाह आणि आरोग्याचा प्रश्न जटील होणार असल्याने यात ग्रामपंचायत सदस्य रणजित घाडगे यांच्यासह काही जणांनी पुढाकार घेतला.
जिल्हाधिकाऱयांसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकायांसमोर अनाधिकृत खडी क्रशर आणि बडय़ा हस्तीकडून होणाऱया दबावाची पुराव्यासह कैफियत मांडली. तरीही दखल घेतली जात नसल्याने अखेर आमरण उपोषणाचा इशारा दिला. पैशाच्या जोरावर, अधिकाऱयांना हाताशी धरून, गावाचा विरोध असताना ही आदित्य सुरेंद्र पवार आणि मनिषा सुरेंद्र पवार यांच्या घागडेवाडी, मलवडी हद्दीतील अनाधिकृत सुरू असलेल्या आदित्य स्टोन क्रशर हा सील करण्याचा तहसिलदारांना उपजिल्हाधिकाऱयांनी आदेश दिला.
तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वैध संमती पत्राशिवाय सदरचा खडी क्रशर सुरु करू नये. या वादग्रस्त आदित्य स्टोन क्रशर हा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी नसताना, अन्य मंजूरी आदेश न घेता सुरू केला होता. याबाबत सविस्तर चौकशी करण्याचे आदेश महसूल उपजिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत. तसेच तो तत्काळ सिल करून त्यांच्या कार्यवाहीची माहिती रणजित घाडगे यांच्यासह निवेदनकर्त्यांना देण्यास सांगितले आहे.
बेसुमार गौण खनिज उत्खनन
पैशाच्या जोरावर धुरळा उडवून शेतकऱयांच्या जमिनी नापीक करण्याचे पाप आदित्य पवार, मनिषा पवार या माया लेकरानी केले आहे. अनाधिकृतपणे बेसुमार गौण खनिज उत्खनन करत खडी क्रशर सुरू केले आहे. याची तहसिलदारांनी प्रत्यक्ष मोजमापे घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करुन दंडात्मक कारवाई केली पाहिजे. तसेच धुरळा उडवत मोठय़ा प्रमाणावर शेताचे नुकसान आणि प्रदुषण केल्याने या दोघावर प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कायद्यानुसार कारवाई करुन चुकीला माफी नाही, हे बडय़ा धेंडय़ांना प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी दाखवून द्यावे, असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य किरण येळे आणि सोनाली कदम यांनी केले आहे.