काश्मीर दौऱ्यावेळी कारला ट्रकची धडक
► वृत्तसंस्था/ जम्मू
केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू शनिवारी एका रस्ते अपघातात थोडक्मयात बचावले. जम्मू-काश्मीरमधील रामबनजवळ त्यांची बुलेटप्रूफ कार एका मालवाहू ट्रकला धडकली. यात कारचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. महामार्गावर लेन बदलण्याच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.
केंद्रीय मंत्री रिजिजू जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. याचदरम्यान जम्मू-श्रीनगर महामार्गावर त्यांच्या वाहनाला अपघात झाला. याप्रसंगी रिजिजू श्रीनगरहून बनिहालला जात होते. कारचे किरकोळ नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.