ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंजाबमध्ये गायक सिद्धू मूसेवालाची हत्या आणि मोहालीमधील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर झालेला रॅकेट प्रोपेल्ड ग्रेनेड हल्ल्यांनंतर आता केंद्रीय मंत्री सोम प्रकाश (Union Minister Som Prakash) यांना धमकीचे पत्र मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांना धमकीचे पत्र मिळाल्याचे समजताच पंजाब पोलीस सतर्क झाले असून मोहाली पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
केंद्रीय राज्यमंत्री सोम प्रकाश यांना त्यांच्या मोहाली येथील निवासस्थानी धमकीचे पत्र मिळाल्यानेपोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी हे संपूर्ण प्रकरण पंजाबचे डीजीपी व्हीके भंवरा यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. यानंतर आता मोहाली पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. दरम्यान हे धमकीचे पत्र कोणी पाठवल याचा तपास पोलीस करत आहेत.
पंजाबमध्ये गायक सिद्धू मूसेवालाच्या (Sidhu Moose Wala Murder) हत्येनंतर मोहालीमधील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर रॅकेट प्रोपेल्ड ग्रेनेड हल्ला झाला होता. आता केंद्री मंत्र्यांना धमकीचे पत्र मिळाल्याने पोलिसांना कोणताच धोका पत्करायचा नाही. त्यामुळे घटनेची माहिती मिळताच डीजीपींना तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री सोम प्रकाश हे हेशियारपूरचे खासदार आहेत. यापूर्वी ते फगवाड्याचे आमदारही होते.