पुणे / प्रतिनिधी :
नवीन शैक्षणिक धोरणाचे क्रियान्वयन संपूर्ण भारतात लवकरात लवकर व्हावे. केंद्रीय विश्वविद्यालय आणि महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांमध्ये योग्य तो बदल करण्यात यावा. भारतातील युवा सक्षमीकरण आणि रोजगार उपलब्धतेसाठी महाविद्यालयात प्लेसमेंट, नवीनता, स्टार्टअप सेंटर उभे करावे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शैक्षणिक सद्य:स्थिती सक्षम होण्यासाठी विद्यापीठाच्या खुल्या निवडणुका पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल यांनी राज्य सरकारकडे शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
‘भारतातील विद्यमान शैक्षणिक सद्य:स्थिती’ या विषयावर बोलताना याज्ञवल्क्मय शुक्ल म्हणाले, नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षा आणि इतर परीक्षांना जीएसटी करमुक्त करण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय स्वागतार्ह आहे. यापूर्वी 8 टक्के जीएसटी कर लावल्याने शुल्कात आणखी वाढ झाली असती. यासंदर्भात अभाविपनेही जीएसटी करातून सूट देण्याची मागणी केली होती. विविध परीक्षा आणि नोकऱ्यांचे शुल्क विद्यार्थ्यांच्या आर्थिक सोयीनुसार असावे. संपूर्ण देशभरात पेपर फुटीचा प्रकार वाढत्या प्रमाणात दिसून येत आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात असा भ्रष्टाचार लाजिरवाणा आहे. यावर आळा बसवण्यासाठी प्रत्येक राज्याने आपल्या राज्यपातळीवर योजना करावी. एक समिती गठीत करून या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यात यावी व आरोपींना योग्य ती शिक्षा द्यावी.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. आजचे विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. अशा आत्महत्या होत राहिल्या, तर देशाचे भविष्य धोक्यात येईल. सरकारने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे व याचे कारण जाणून घेऊन यावर लवकरच काही तोडगा काढला पाहिजे. प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन केंद्र उभे रहावे. वैद्यकीय क्षेत्रात आजच्या तारखेला एमबीबीएसच्या एक लाखाहून अधिक जागा वाढल्या आहेत. यामुळे भारताच्या वैद्यकीय क्षेत्राला अजूनच आधार भेटेल. वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना भारताबाहेर जाण्याची गरज पडणार नाही. ते भारतातच शिक्षण घेऊ शकतील. महाराष्ट्रातदेखील एमबीबीएससाठी 14 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची घोषणा राज्य सरकारने केल्याने महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात चांगलाच फायदा होईल, असेही त्यांनी नमूद केले.
अधिक वाचा : वारिशेंचा अपघात जाणीवपूर्वक घडवला; राज्य सरकारची कबुली