भारताला टेन्शन ः इंजिनला आग लागण्याच्या घटनांमुळे अमेरिकेचा निर्णय
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन, नवी दिल्ली
व्हिएतनामपासून अफगाणिस्तानच्या युद्धात स्वतःचा प्रभाव दाखवून देणाऱया सीएच-47 चिनूक हेलिकॉप्टर्सला अमेरिकेच्या वायुदलाचा प्राण म्हटले जायचे. परंतु या हेलिकॉप्टर्सच्या इंजिनमध्ये आग लागण्याच्या अनेक घटनांनंतर अमेरिकेने याच्या उड्डाणांना रोखले आहे. सुमारे 400 चिनूक हेलिकॉप्टर्सचे उड्डाण रोखण्यात आल्याचे अमेरिकेच्या सैन्याने स्पष्ट केले आहे. हेलिकॉप्टर्सच्या दुर्घटनेत कुठलीच जीवितहानी झालेली नाही, परंतु सतर्कतेच्या दृष्टीकोनातून या हेलिकॉप्टर्सचा वापर रोखण्यात आल्याचे सांगण्यात आले.
चिनूक हेलिकॉप्टरचा वापर भारतासह 20 देश करत आहेत. अमेरिकेच्या या पावलामुळे भारतीय वायुदलासमोर समस्या उभी राहिली आहे. भारतीय वायुदलाने या हेलिकॉप्टर्ससंबंधी पूर्ण माहिती मागविली आहे.
चिनूक हेलिकॉप्टर्सच्या इंजिनमध्ये आग लागण्याचा धोका वाढला होता. यामुळे अमेरिकेच्या सैन्याने याची उड्डाणे रोखली आहेत. चिनूक हेलिकॉप्टर अमेरिकेच्या व्हिएतनाम युद्धापासून अफगाणिस्तान, आखातातील अनेक युद्धांमध्ये महत्त्वाचे ठरले होते. भारतीय वायुदलाने अमेरिकेतील कंपनी बोइंगकडून हेलिकॉप्टर्सच्या उड्डाणांना रोखण्यामागील कारणांविषयी माहिती मागविली आहे. भारताकडे सध्या 15 चिनूक हेलिकॉप्टर्स असून ती सैनिकांना पर्वतीय तसेच मैदानी भागात पोहोचवू शकतात.
तोफा वाहून नेण्याची क्षमता
चिनूक हेलिकॉप्टरद्वारे एम-777 हॉवित्झर तोफ कुठल्याही पर्वतीय भागात सहजपणे नेता येते. भारतीय वायुदलात मार्च 2019 मध्ये याचा समावेश करण्यात आला होता. भारतात चिनूक हेलिकॉप्टर्सना चंदीगडमध्ये तैनात करण्यात आले आहे. तर दुसरी युनिट ईशान्येतील चीनचे आव्हान पाहता आसाममध्ये ठेवण्यात आली आहे. चिनूक हेलिकॉप्टरमध्ये दोन इंजिन्स असून ते कुठल्याही प्रकारची मोहीम पार पाडू शकते.
अत्याधुनिक यंत्रणा
या हेलिकॉप्टरमध्ये पूर्णपणे एकीकृत आणि डिजिटल कॉकपिट व्यवस्थापन सिस्टीम असून यात अत्याधुनिक कार्गो हँडलिंग क्षमता आहे. चिनूकचे मुख्य कार्य सैनिक, तोफा, शस्त्रास्त्रs आणि इंधन एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी नेणे आहे. या हेलिकॉप्टरला प्रामुख्याने व्हिएतनाम युद्धासाठी अमेरिकेने तयार केले होते. या हेलिकॉप्टरच्या मदतीने 36 सैनिकांना नेता येते. चिनूकला पुढील काळात अधिक शक्तिशाली आणि घातक स्वरुप देण्यात आले होते. चिनूकला जगातील सर्वात वेगवान सैन्य हेलिकॉप्टर मानले जाते. याचा कमाल वेग 315 किलोमीटर प्रतितास इतका आहे. अमेरिकेनंतर ब्रिटनच्या सैन्यात याचा सर्वाधिक वापर होतो. भारतीय सैन्य देखील मागील काही वर्षांमध्ये याचा मोठय़ा प्रमाणावर वापर करत आहे. याच्या मदतीने लडाखपासून सियाचिनपर्यंत भारतीय सैनिकांपर्यंत सामग्री पोहोचविली जात आहे.