Various cultural programs in Insuli on the occasion of Shiv Jayanti celebrations
शिवजयंती सोहळ्यानिमित्त येथील शिवजयंती उत्सव मंडळ, मराठा समाज इन्सुली व इन्सुली ग्रामस्थ यांच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने उत्सव समितीचे प्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, शोभायात्रा , शिवचरित्रावर आधारित नाट्यपुष्प व डबलबारीचा जंगी सामना असे विविध कार्यक्रम होणार आहेत. विशेष म्हणजे शिवजयंती निमित्त गावातील प्रत्येक घरासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांची छबी असलेला भगवा झेंडा उभारण्यात येणार असून त्यासाठी उत्सव समितीच्या वतीने प्रत्येक घरात आदल्या दिवशी पर्यंत झेंड्याचे वाटप करण्यात येणार आहे तसेच यासाठी गावस्तरावर वेगळी समिती स्थापन करण्यात आली आहे.
शिवजयंती उत्सवानिमित्त समिती प्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सायंकाळी बैठक सांस्कृतिक सभागृह कोनवाडा येथे पार पडली यावेळी मराठा समाज अध्यक्ष नितीन राऊळ, तंटामुक्त समिती अध्यक्ष रघुनाथ देऊलकर, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष उमेश पेडणेकर,खजिनदार किरण गावडे, संचालक मनोहर गावकर, माजी सरपंच नाना पेडणेकर, मयुर चराटकर, सामाजिक कार्यकर्ते आपा आमडोसकर, आनाजी देसाई, सुरेंद्र कोठावळे, न्हानू कानसे,वैभव राणे, स्वामी पेडणेकर, सुनील सावंत, दाजी हांडेकर, संकेत राऊळ आदीसह इन्सुली ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी चर्चे दरम्यान कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली यात बबन राणे यांच्या संयोजनातून प्रत्येक घरासमोर शिवजयंती निमित्ताने गुढी उभारण्यात यावी असे ठरविण्यात आले असून त्यासाठी संपूर्ण गावातील घरात लागणारे शिवाजी महाराजांची छबी असलेले झेंडे ते स्वतः पुरविणार असून त्यासाठी समिती सुद्धा निवडण्यात आली. तसेच इन्सुली गावठाण येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ठिकाणी दरवर्षी होणाऱ्या उत्सवा शिवाय अन्य कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले यात इन्सुली गावातील दहाही शाळा व हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी सकाळी 9 वाजता हजर राहणार आहेत त्यात प्रत्येक शाळेला शिवचरित्रावर आधारित कार्यक्रम करावयाचा आहे त्यातून अनुक्रमे तीन क्रमांक काढण्यात येणार आहेत.
प्रतिनिधी
बांदा