पावसाची तमा न बाळगता जोरदार तयारी, चार राज्यांतील 10 हजार मठानुयायी व भाविकांची उपस्थिती अपेक्षित
प्रतिनिधी /काणकोण
श्री संस्थान पर्तगाळ जिवोत्तम मठाचे 23 वे गुरुस्वामी श्रीमद् विद्याधिराजतीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराजांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त पर्तगाळी मठात 8 ते 10 जुलैपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पावसाची तमा न बाळगता या ठिकाणी जोरदार तयारी चालू असून विविध भागांतून आलेले मठाचे अनुयायी निरपेक्षपणे या ठिकाणी वावरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
या तीन दिवसांच्या कार्यक्रमांना साधारणपणे 10 हजार अनुयायी व भाविकांची उपस्थिती अपेक्षित असून त्यांच्या निवासाची आणि भोजनाची जय्यत तयारी मठ समितीने केली आहे. मुख्य समारंभ ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आला आहे. मठ वास्तूच्या परिसरात तीन विविध ठिकाणी भोजन कक्ष उभारण्यात आलेले असून हे कक्ष देखील पावसापासून सुरक्षित असे बनविण्यात आले आहेत. हे सर्व साहित्य आणि त्यासाठी वावरणारे कामगार खास मेंगलोर येथून आलेले आहेत.
या कर्यक्रमांना गोवा, कर्नाटक, केरळ तसेच महाराष्ट्रातून मोठय़ा संख्येने भाविक आणि मठानुयायी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या वाहनांसाठी खास तीन ठिकाणी वाहनतळ उभारण्यात आले आहेत. यानिमित्ताने पर्तगाळी येथे खास ट्रान्सफॉर्मर तसेच भारत संचार निगमचा विशेष मनोरा उभारण्यात आला आहे. संपूर्ण कार्यक्रम विद्यमान श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. प. पू. विद्याधिराजतीर्थ स्वामी महाराजांची समाधी विशेष ढंगात सजविण्यात आली असून त्या समाधीसमोर 9 रोजी धार्मिक विधी होणार आहेत. प्रवेशद्वारापासून मठापर्यंत सर्वत्र रोषणाई करण्यात येणार असून त्याची जय्यत तयारी सध्या चालू आहे.
8 रोजी भक्तीसंगीत
8 रोजी पहाटे 5.30 पासून हरी स्मरणम् दिनखाली विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी 8.30 वा. प. पू. श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांच्या हस्ते मठ प्राकारात उभारलेल्या नवीन खोल्यांचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर महापूजा, हस्तोदक, हवन पूर्णाहुती, अन्नसंतर्पण आणि दुपारी 2 वा. पाद्यपूजा, तर संध्याकाळी 4 वा. श्रीदेवी भट शिराली आणि शांतेरी कामथ मंजेश्वर यांचा भजनामृत हा कार्यक्रम होणार आहे. 6 वा. बेंगळुरू येथील रघुनंदन भट आणि गोव्याचा अक्षय नायक यांचा भक्तीसंगीत फ्युजन हा कार्यक्रम होणार आहे. रात्री 8 वा. दिपोत्सव, श्री रामदेव पुष्पपूजा आणि प्रसाद वितरण होणार आहे.
9 रोजी जुगलबंदी
9 रोजी गुरुवंदनाच्या खाली पहाटे 5.30 पासून विविध धार्मिक विधी होणार आहेत. सकाळी 8.30 वा. श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांच्या हस्ते स्वामी विद्याधिराज भवनचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सकाळी 10 वा. मुख्यप्राण विग्रह प्रतिष्ठा, पूर्णाहुती, अन्नसंतर्पण, ब्राह्मण दक्षिणा आणि दुपारी 3 वा. जिवोत्तम सभामंडपात सभा कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी 6.30 वा. आनंद भाटे आणि राहुल देशपांडे यांचा अभंगवाणी आणि नाटय़संगीत जुगलबंदी कार्यक्रम होणार आहे. रात्री 8 वा. बेंगळुरू येथील विख्यात स्पीड आर्टिस्ट विलास नायक यांचा आर्ट वर्क परफॉर्मन्स हा विशेष कार्यक्रम होणार आहे.
10 रोजी अखंड भजन
10 रोजी हरी स्मरणम्खाली पहाटे 6 वा. धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. सकाळी 7 वा. आषाढी एकादशीनिमित्त भजनांचा शुभारंभ प. पू. स्वामी महाराजांच्या हस्ते दीप्रज्वलनाने होणार आहे. 8 वा. अखंड भजन कार्यक्रम सुरू होणार आहे. 24 तास चालणाऱया या भजन कार्यक्रमात एकूण 22 पथके सहभागी होणार आहेत. त्यात वीर वेंकटेश भजन मंडळ, मेंगलोर, श्री वेंकटरमण भजन मंडळ महिला मंडळ कारकल, श्री वीर विठ्ठल भजन मंडळ सोमेश्वर, श्री लक्ष्मी वेंकटरमण भजन मंडळ उप्पीनगडी, श्री लक्ष्मी वेंकटरमण भजन मंडळ पादुबिद्री, श्री राम भजन मंडळ हेबरी, श्री वरदराज भजन मंडळ गुरूपूर, श्री लक्ष्मी वेंकटेश भजन मंडळ कुंदापूर, श्री वरदराज वेंकटरमण भजन मंडळ कासरगोड, वीर विठ्ठल भजन मंडळ भटकल, वीर मारूती भजन मंडळ होन्नावर, वेंकटरमण भजन मंडळ कुमठा, वैदिका भजन मंडळ उत्तर कन्नड, श्री कृष्णा भजन मंडळ हुबळी, श्री वेंकटेश भजन मंडळ बसवनगुडी, श्री वीर विठ्ठल भजन मंडळ गंगोळी, श्री आर्यादुर्गा भजन मंडळ लोलये-काणकोण, श्री अश्वत्थ नारायण भजन मंडळ मोखर्ड-काणकोण, जीएसबी सभा महिला मंडळ डोंबिवली-मुंबई, श्री राम भजन मंडळ वडाळा-मुंबई, लक्ष्मी वेंकटरमण भजन मंडळ उपन्डा, श्री लक्ष्मी वेंकटरमण भजन मंडळ सिद्धापूर यांचा सहभाग राहणार आहे. सकाळी 8.30 वा. तप्तमुद्रा धारण आणि संध्याकाळी 6.30 वा. होणाऱया श्री रामदेव आणि श्री वीर विठ्ठल महापूजेने या तीन दिवसांच्या कार्यक्रमांची सांगता होणार आहे.