वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ब्राझीलमधील कॅक्सिअस येथे सुरू असलेल्या बधिरांच्या डेफलिम्पिक्समध्ये चौथ्या दिवशी भारताने नेमबाजीत तिसरे पदक मिळविले असून महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत वेदिका शर्माने कांस्यपदक मिळविले.
वेदिकाने अंतिम फेरीत 207.2 गुण नोंदवत तिसरे स्थान मिळविले. चिनी तैपेईच्या काओ या जु हिने 232 गुण घेत रौप्य मिळविले. युक्रेनच्या इना अफोनचेन्कोने सुवर्ण मिळविताना 236.4 गुण नोंदवले. आठ महिलांच्या अंतिम फेरीत 24 शॉट्स देण्यात आले होते.
या स्पर्धेच्या तिसऱया भारताच्या धनुष श्रीकांतने पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल प्रकारात सुवर्ण तर शौर्य सैनीने कांस्यपदक मिळविले होते. याशिवाय मिश्र सांघिक बॅडमिंटनमध्ये मिळविलेले सुवर्णासह भारताची एकूण 4 पदके झाली असून पदकतक्त्यात भारत आठव्या स्थानावर आहे.
महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकाराच्या अंतिम फेरीसाठी भारताच्या दोघी पात्र ठरल्या होत्या. पात्रता फेरीत वेदिकाला मागे टाकत चौथे स्थान मिळविलेल्या प्रांजली धुमाळचे पदक मात्र थोडक्यात हुकले. तिने 561 गुण नोंदवत पात्रता फेरीत चौथे तर वेदिकाने 538 गुण घेत आठवे स्थान मिळविले होते.
महिलांच्या 10 मी. एअर रायफल प्रकारात भारताच्या दोघी अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या होत्या. प्रियेशा देशमुखने अंतिम फेरीत 203.4 गुणांसह चौथे तर नताशा जोशीने 141.1 गुण घेत सातवे स्थान मिळविले. 60 शॉट्सच्या पात्रता फेरीत त्यांनी अनुक्रमे 618.9 व 617.6 गुण नोंदवले होते. या स्पर्धेसाठी भारताने 65 जणांचे बलाढय़ पथक पाठविले असून त्यात 10 नेमबाजांचा समावेश आहे. भारताचे हे या स्पर्धेतील आजवरचे सर्वात मोठे व युवा पथक असून 11 क्रीडा प्रकारांत ते सहभागी होत आहेत.