वृत्तसंस्था/ रॉसेयु (डॉम्निका)
‘सामनावीर’ रोव्हमन पॉवेलच्या शानदार कामगिरीच्या जोरावर यजमान विंडीजने रविवारी येथे झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेताना बांगलादेशचा दुसऱया सामन्यात 35 धावांनी पराभव केला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विंडीजने 20 षटकांत 5 बाद 193 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशने 20 षटकांत 6 बाद 158 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 35 धावांनी गमवावा लागला.
विंडीजच्या डावामध्ये सलामीच्या किंगने 43 चेंडूत 1 षटकार 7 चौकारांसह 57 धावा जमविल्या. मेयर्सने 9 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 17, कर्णधार निकोलस पुरनने 30 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 34, पॉवेलने 28 चेंडूत 6 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 61, ओडेन स्मिथने 4 चेंडूत 1 षटकारांसह नाबाद 11 धावा जमविल्या. ब्रुक्सला खाते उघडता आले नाही. शेफर्डने 3 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 10 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे एस इस्लामने 2 तर मेहदी हसन, शकीब अल हसन आणि एम. हुसेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. विंडीजची 13 षटकाअखेर स्थिती 3 बाद 100 अशी होती. त्यानंतर पॉवेलच्या आक्रमक फटकेबाजीमुळे विंडीजला शेवटच्या सात षटकांत 93 धावा जमविता आल्या. पॉवेलने शकीब अल हसनच्या एका षटकांत 23 धावा झोडपल्या. पॉवेल आणि कर्णधार पुरन यांनी तिसऱया गडय़ासाठी 74 धावांची भागिदारी केली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशचे वरच्या फळीतील फलंदाज आक्रमक फटकेबाजी करू शकले नाहीत. सलामीची जोडी अनामुल हक आणि लिटॉन दास हे अनुक्रमे 3 आणि 5 धावांवर बाद झाले. त्यानंतर कर्णधार मेहमुदुल्ला 11 धावांवर तंबूत परतला. बांगलादेशची स्थिती 3 बाद 23 अशी झाली होती. शकीब अल हसन आणि अतिफ हुसेन यांनी चौथ्या गडय़ासाठी 58 धावांची भागिदारी केली. शकीब अल हसनने 52 चेंडूत 3 षटकार आणि पाच चौकारांसह नाबाद 68 तर अतिफ हुसेनने 27 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 34 धावा जमविल्या. नुरूल हसनने 7 धावा जमविल्या. मेहदी हसनने नाबाद 5 धावा केल्या. एम हुसेनने 11 चेंडूत 1 षटकारांसह 15 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावात 6 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे मॅके आणि शेफर्ड यांनी प्रत्येकी दोन तर अकिल हुसेन आणि ओडेन स्मिथ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
विंडीज 20 षटकांत 5 बाद 193 (किंग 57, मेयर्स 17, ब्रुक्स 0, पुरन 34, पॉवेल नाबाद 61, शेफर्ड 3, स्मिथ नाबाद 11, एस.इस्लाम 2-40, मेहदी हसन, शकीब अल हसन, एम. हुसेन प्रत्येकी एक बळी), बांगलादेश 20 षटकांत 6 बाद 158 ( अनामुल हक 3, दास 5, शकीब अल हसन नाबाद 68, मेहमुदुल्ला 11, अतिफ हुसेन 34, नुरूल हसन 7, एम. हुसेन 15, मेहदी हसन नाबाद 5, मॅके 2-37, शेफर्ड 2-28, अकिल हुसेन 1-27, स्मिथ 1-32).