थायलंडमध्ये बडतर्फ पोलीस अधिकाऱयाचा बालकेंद्रात गोळीबार : 24 मुलांसह 35 ठार
- झोपलेल्या मुलांवर बेछूट गोळीबार
- स्वतःच्या पत्नी-मुलालाही संपवले
- स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
बँकॉक / वृत्तसंस्था
थायलंडमधील एका बाल संगोपन केंद्रात गुरुवारी बंदुकधाऱयाने गोळीबार करत हाहाकार माजवला. उत्तर प्रांतातील नॉन्गबुआ लम्फू येथे झालेल्या घटनेत 24 मुलांसह 35 जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोर हा माजी पोलीस अधिकारी असून सेवेतून बडतर्फ केल्याच्या रागातून त्याने निष्पाप चिमुकल्यांचा बळी घेतल्याचा दावा प्राथमिक तपासाअंती करण्यात आला आहे. पन्या खमराब (34) असे हल्लेखोराचे नाव असून अमली पदार्थ प्रकरणी त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. बाल संगोपन केंद्रात गोळीबार केल्यानंतर खमराबने आत्महत्या केली. यापूर्वी त्याने स्वतःच्या पत्नी आणि मुलाचीही हत्या केली.
हल्लेखोर उच्चशिक्षित आणि तंदुरुस्त होता. पोलिसात अधिकारी झाल्यानंतर काही महिन्यांतच अमली पदार्थांच्या तस्करीत त्याचा सहभाग स्पष्ट झाला होता. त्यानंतर आंतर-कार्यालय तपासणीत तो दोषी आढळल्यानंतर त्याला बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर तो पूर्णवेळ ड्रग्ज तस्कर बनला. त्याला एकदा अटकही झाली होती. ते प्रकरण अजूनही न्यायालयात सुरू आहे. खमराब याला नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले होते, असे थायलंडच्या सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचे (सीआयबी) अधिकारी मेजर जनरल जिरापोब पुरीदते यांनी सांगितले.
ईशान्य थायलंडमधील बालसंगोपन केंद्रात गुरुवारी झालेल्या हल्ल्यात किमान 24 मुले आणि 11 प्रौढांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱयांनी सांगितले. हल्ल्यानंतर बंदूकधारी घटनास्थळावरून पळून गेला. घरी परतत असतानाही त्याने आपल्या कारमधून गोळीबार केला. घरी त्याने स्वतः चा जीव घेण्यापूर्वी पत्नी आणि मुलाची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. थाई मीडियाच्या वृत्तानुसार, बंदुकधारी व्यक्तीने हल्ल्यात चाकूचाही वापर केला होता.
गोळीबाराच्या घटनेनंतर वुतुचाई बाओथॉन्ग नावाच्या युजरने आपल्या फेसबुक पेजवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये एक लहान मूल आणि काही लोक आजूबाजूला बसलेले दिसत आहेत. त्यांचे चेहरे अस्पष्ट आहेत. थायलंडमध्ये बंदूक-संबंधित मृत्यू अमेरिका आणि ब्राझील सारख्या देशांच्या तुलनेत खूपच कमी आहेत. परंतु बंदूक नियंत्रण कायदे कठोर असलेल्या जपान आणि सिंगापूर सारख्या देशांपेक्षा जास्त आहेत.
गर्भवती पत्नीसह 2 वर्षाच्या मुलाला संपवले
संशयित पळून गेल्यानंतर त्याने आपल्या कारमधून गोळीबार करणे सुरूच ठेवले आणि अनेक लोकांना मारले, असे पोलीस मेजर जनरल पैसल लुसॉम्बून यांनी सांगितले. घरी आल्यानंतर त्याने आत्महत्या करण्यापूर्वी पत्नी आणि मुलाची हत्या केली. गोळीबार सुरू झाला तेव्हा स्थानिक अधिकारी जिदापा बन्सम जवळच काम करत होते. त्यांनी यासंबंधी बोलताना सुरुवातीला आपल्याला फटाके वाजवल्यासारखे वाटले. त्यानंतर आरडाओरड सुरू होताच गोळीबार झाल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले.