बेळगावच्या सिद्धेश असलकरचे 6 गडी व दमदार शतक
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आयोजित 16 वर्षाखालील आंतरझोन क्रिकेट स्पर्धेत धारवाड झोनने रायचूर झोनचा पराभव करून पहिला विजय संपादन केला आहे. बेळगावच्या अष्टपैलू सिद्धेश असलकरने नाबाद 103 धावा व 6 गडी बाद करून अष्टपैलू कामगिरी केली तर आशुतोष हिरेमठने त्याला 63 धावा करीत सुरेख साथ दिली.
बेंगळूर येथे खेळविण्यात आलेल्या आंतरझोन क्रिकेट स्पर्धेत धारवाड झोनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 58 षटकात सर्व बाद 257 धावा केल्या. त्यात आशुतोष देशपांडेने 12 चौकारासह 85, आकाश कुलकर्णीने 2 चौकारासह 44, सिद्धेश असलकरने 4 चौकारासह 38, मणिकांतने 3 चौकारासह 29 तर अखिल एस.ने 23 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना रायचूरचा पहिला डाव 74.2 षटकात सर्व बाद 155 धावात आटोपला. त्यात ओंकार शर्मा व लोकनाथ साली यांनी प्रत्येकी 29, ओंकार भंडारीने 26 तर अनिकेत रेड्डीने 25 धावा केल्या. धारवाड झोनतर्फे गोलंदाजी करताना सिद्धेश असलकरने 15.2 षटकात 29 धावात 6 गडी बाद करीत निम्म्याहून अधिक संघ बाद केला. त्याला मणिकांत शिवानंदने 37 धावात 3 तर आदित्य खीलारेने 1 गडी बाद करून सुरेख साथ दिली.
दुसऱया डावात खेळताना धारवाड विभागने 58 षटकात 3 गडी बाद 217 धावा केल्या. त्यात बेळगावच्या सिद्धेश असलकरने 5 चौकाराच्या मदतीने 185 चेंडूत 103 धावा करून आपले पहिले शतक झळकविले. त्याला आशुतोष हिरेमठने 7 चौकारासह 63 तर अखिल एस.ने 19, मणिकांतने 17 धावा केल्या. सिद्धेश असलकर व आशुतोष हिरेमठ यांनी दुसऱया गडय़ासाठी 123 धावांची भागीदारी तर सिद्धेश व अखिल एस. यांनी पहिल्या गडय़ासाठी 50 धावांची भागीदारी केली. पहिल्या डावाच्या आघाडीमुळे धारवाड विभागिय संघाला विजयी घोषित करण्यात आले.